मी महर्षी कर्वेंचा (नसलेला) पुतळा बोलतोय...

मयूर जितकर
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

नमस्कार, तुम्ही मला ओळखलंच असेल! मी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णासाहेब कर्वे यांचा पुतळा बोलतोय. आपल्या देशात माणसांचीच गाऱ्हाणी नीट ऐकली जात नसताना, पुतळा बोलेलच कसा? आणि त्याचं ऐकणार तरी कोण? असे प्रश्‍न खरंच मनात आणू नका. मला तुमच्यापाशी माझं मन मोकळं करायचंय, एवढंच. 

नमस्कार, तुम्ही मला ओळखलंच असेल! मी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णासाहेब कर्वे यांचा पुतळा बोलतोय. आपल्या देशात माणसांचीच गाऱ्हाणी नीट ऐकली जात नसताना, पुतळा बोलेलच कसा? आणि त्याचं ऐकणार तरी कोण? असे प्रश्‍न खरंच मनात आणू नका. मला तुमच्यापाशी माझं मन मोकळं करायचंय, एवढंच. 

पुण्यातल्या कोथरूडमध्ये माझ्या नावानं नगर आहे, कर्वेनगर. तसंच, कर्वे रस्ताही आहे आणि मीही तिथंच होतो, खरंतर एका महान समाजसुधारकाच्या कार्याचं आपण प्रतीक आहोत, याचा मला खूप अभिमान वाटतो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सुशोभीकरणासाठी मला माझ्या जागेवरून काढलयं. अजूनही हे सुशोभीकरण सुरूच आहे. याच गतीनं मी माझ्या उभ्या आयुष्यात काम केलं असतं तर, काय झालं असतं कोणास ठाऊक! असो. हे सुशोभीकरण पूर्ण करून मला लवकरात लवकर पुन्हा जागेवर बसवावं, अशी मागणी जोर धरतेय. त्यासाठी, आरोप, प्रत्यारोप होताहेत. निषेधमोर्चेही काढले जातायत. आपल्या देशात, विशेषत: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत. आमच्यासारख्या महापुरुषांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, हा त्यामागचा उद्देश; पण अशी प्रेरणा तुमच्यापैकी किती जणांनी घेतली, असा माझा तुम्हाला रोकडा सवाल आहे. तुम्ही खऱ्या अर्थानं प्रेरित झाला असता, तर दुसरे डॉ. आंबेडकर, दुसरे महात्मा गांधी आणि दुसरे महर्षी कर्वेसुद्धा कधीच तयार झाले असते. आमचा पुतळा उभा केला, एखाद्या चौक, रस्त्याला नाव दिलं की, आपली जबाबदारी संपली, असंच तुम्हाला वाटतं का? स्मार्टफोनची लेटेस्ट व्हर्जन्स पटापटा सांगणाऱ्या तुमच्या ‘नेक्‍स्ट जनरेशन’ला महर्षी कर्वे यांच्याविषयी दोन ओळी तरी सांगता येतील का? तेही गुगलवर सर्च न करता. तुम्हाला खरं सांगू का, कोणताच महापुरुष काय किंवा समाजसुधारक काय, पुतळा, चौक, रस्ता यात कधीच नसतो. तो त्याच्या विचारांत आणि कार्यातच शोधायचा असतो. तुमच्यापैकी किती जण आम्हाला असं ‘सर्च’ करतात? फारच कमी जण, खरं ना?

द्रष्टा समाजसुधारक
महर्षी कर्वेंविषयी तुम्हाला सांगतोच... रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड हे त्यांचे गाव. खरंतर त्यांना स्वतःच्याच शिक्षणासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. त्यातूनच हा द्रष्टा समाजसुधारक घडला. हिंगण्याच्या माळरानावरील झोपडीतील मुलींच्या शाळेपासून एसएनडीटी विद्यापीठापर्यंतचा त्यांचा प्रवास मला अगदी स्पष्टपणे आठवतोय. एसएनडीटी तर देशातील महिलांसाठीच पहिले विद्यापीठ ठरले. विधुर पुरुषानं अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याचा तो काळ. मात्र, या काळातही त्यांनी पंडिता रमाबाईंच्या शारदासदन संस्थेतील गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. याच गोदूबाई आपल्या पतीच्या कार्यात सक्रिय वाटा उचलत बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. ‘अनाथ बालिकाश्रम’, ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळा’ची स्थापना करणाऱ्या महर्षी कर्वे यांच्या कार्याबद्दल सांगाव तेवढं थोडंच!  तुमच्यापैकी बहुतेकांना हे सारं माहिती नसंल, म्हणूनच सांगितलं. नाहीतर, आजच्या ‘व्हर्च्युअल’ जगात कालच्या जगातल्या या ‘रिअल’ गोष्टी बोअरच व्हायच्या तुम्हाला. आजही महर्षी कर्वे पुतळ्यात किंवा त्यांच्या नावाच्या रस्त्यात नसतातच, ते असतात दुर्गम भागात शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या गरीब मुलींच्या झोपडीत.. ते सापडले तर तिथंच सापडतील, जमलं तर शोधा.. एवढंच सांगतो आणि थांबतो... 

Web Title: Maharshi keshav Karve Statue