महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना अभिवादन

क्वार्टर गेट - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. या वेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, नितीन पवार व इतर.
क्वार्टर गेट - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. या वेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, नितीन पवार व इतर.

पुणे - भारतीय समाजातील अस्पृश्‍यतेविरुद्ध मवाळ मार्गाने बंड पुकारणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या वाट्याला जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही उपेक्षा आली, अशी खंत व्यक्त करीत बहुसांस्कृतिक पुणे नागरिक समितीच्या वतीने ७६व्या स्मृती दिनानिमित्त त्यांना गुरुवारी अभिवादन केले.

सवर्ण समाजात जन्म, परदेशात उच्चशिक्षण घेऊनही महर्षी शिंदे यांनी आपला जीवनमार्ग वेगळाच निवडला. वैचारिक पातळीवर भारतातील अस्पृश्‍यतेची मीमांसा, स्वातंत्र्यपूर्वकाळातील काँग्रेसच्या अधिवेशनात या हीन प्रथेविरुद्ध ठराव केला. त्यांच्या या कार्याचे स्मरण या वेळी करण्यात आले. उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी क्वार्टर गेटजवळील महर्षी शिंदे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

या परिसराच्या सुशोभीकरणाची मागणी समितीने केली. नगरसेविका लता राजगुरू, समितीचे निमंत्रक नितीन पवार, मोहन वाडेकर, ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यलयाचे सहायक आयुक्त दयानंद सोनकांबळे, गोपाळ गोरखे, विजय जगताप, ओंकार मोरे आदी उपस्थित होते. शेंडगे यांनी महर्षी शिंदे पुतळा येथे सुशोभीकरणासह भित्तीशिल्प, माहिती फलक, विद्युतदिवे लावण्याचे आश्‍वासन दिले.

पवार म्हणाले, ‘‘महर्षी शिंदे यांचे जीवन त्यागाने भरलेले आहे. त्यांनी स्पृश्‍यास्पृश्‍यांच्या शिक्षणासाठी संस्था स्थापन केली. मात्र त्यावर आपण वा आपल्या सवर्ण वारसाने आपला हक्क, वारसा सांगू नये, म्हणून या संस्थेच्या कारभाराचे सर्व अधिकार दलितांनाच मिळतील, अशी तरतूद संस्थेच्या घटनेत केली. दलितांची दु:खं कळावीत म्हणून ते राजेवाडी (पूर्वीची भोकरवाडी) या दलित वस्तीमध्ये आपल्या बहिणीसह राहिले. त्यांचे कार्य काळाच्या पुढे जाणारे होते.’

स्त्रियांच्या प्रश्नांवर मोठे कार्य - डॉ. मोरे 
‘‘म हर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रत्यक्ष काम करणे आणि संस्थात्मक काम करणे, यामधील फरक ओळखून अस्पृश्‍यता आणि स्त्रियांच्या प्रश्नांवर मोठे कार्य केले. अस्पृश्‍यतेचे मूळ शोधून त्यावर काम करणारे संशोधक म्हणजे शिंदे होते. विठ्ठल रामजी शिंदे हे महाराष्ट्रातील आद्य अस्पृश्‍यतानिवारक होते,’’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

‘द फर्ग्युसोनियन्स’ या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संस्थेच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाविद्यालयात स्मरण व्याख्यानाचे आयोजन केले. या वेळी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याबद्दल डॉ. मोरे बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे, डॉ. शरद कुंटे, टी. बी. बहिरट, विजय सावंत, रवींद्रसिंह परदेशी, गणेश चव्हाण, रणजित मोरे, प्रकाश रेणुसे  या वेळी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com