Vidhan Sabha 2019 : पुणे जिल्ह्यात बहुतांश दुरंगी लढती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 October 2019

आंबेगाव विधानसभेसाठी ‘मनसे’चे वैभव दत्तात्रय बाणखेले, अपक्ष अशोक दत्तात्रय काळे पाटील, जनता दल सेक्‍युलर पक्षाचे नाथा हरिभाऊ शेवाळे यांनी माघार घेतली. त्यामुळे रिंगणात ६ उमेदवार आहेत. मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप वळसे पाटील व शिवसेनेचे राजाराम भिवसेन बाणखेले यांच्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले.

आंबेगावात तिघांची माघार
घोडेगाव - आंबेगाव विधानसभेसाठी ‘मनसे’चे वैभव दत्तात्रय बाणखेले, अपक्ष अशोक दत्तात्रय काळे पाटील, जनता दल सेक्‍युलर पक्षाचे नाथा हरिभाऊ शेवाळे यांनी माघार घेतली. त्यामुळे रिंगणात ६ उमेदवार आहेत. मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप वळसे पाटील व शिवसेनेचे राजाराम भिवसेन बाणखेले यांच्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले.

शिरूरला दहा उमेदवार
शिरूर - जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी सदस्य मंगलदास बांदल व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्‍वर कटके यांनी रिंगणातून माघार घेतल्याने शिरूर मतदारसंघातील बंडाची मशाल थंड झाली आहे. बाबूराव पाचर्णे व अशोक पवार या आजी-माजी आमदारांत सामना रंगणार आहे.

जुन्नरला ११ उमेदवार रिंगणात
जुन्नर - जुन्नर विधानसभा मतदारसंघात अर्ज माघारीनंतर अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सारंग कोडलकर व सहायक अधिकारी हणमंत कोळेकर यांनी दिली. अखेरच्या दिवशी बारापैकी तुषार शिवाजी थोरात यांनी माघार घेतली. 

खेड-आळंदीत तिरंगी लढत
राजगुरुनगर - खेड-आळंदी मतदारसंघात चार जणांच्या अर्ज माघारीनंतर एकूण ९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय तेली यांनी दिली. दिलीप मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस), सुरेश गोरे (शिवसेना) आणि अतुल देशमुख (भाजप बंडखोर) असा तिरंगी सामना रंगणार आहे.

दौंडला ४ जणांची माघार
कुरकुंभ - दौंड विधानसभा मतदारसंघात १७ पैकी ४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने १३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी अपक्ष उमेदवार आनंदराव कृष्णाजी थोरात, प्रकाश किसन देशमुख, रवींद्र कुशाबा जाधव, राजाराम शिवाजी कदम या चार उमेदवारांनी माघार घेतली.

भोरमध्ये ७ जण रिंगणात
भोर - विधानसभा निवडणुकीच्या भोर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या चार उमेदवारांनी सोमवारी (ता. ७) आपले अर्ज माघारी घेतले. यामध्ये भाजपचे बंडखोर किरण दगडे आणि अपक्ष अर्ज दाखल केलेले दत्तात्रेय टेमघरे, डॉ. यशराज पारखी व सुनील गायकवाड आदींचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahashtra Vidhansabha 2019 Pune District Politics