'सौ दाऊद, एक राऊत' ग्रुपवरुन अशी उडविली भाजपची खिल्ली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

महाविकासआघाडीच्या सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणार्या खासदार संजय राऊत यांच्या नावाने सोशल मीडियात 'सौ दाऊद, एक राऊत असा' ग्रुप फेसबुकवरती सक्रीय आहे. या ग्रुपवरून सध्या भाजपच्या आंदोलनावरती निशाणा साधला जात आहे.

पुणे : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार असमर्थ असल्याचं सिद्ध झाल्याची टीका करत भारतीय जनता पक्षाने आज महाराष्ट्र बचाव आंदोलन आज (ता. 22 मे) पुकारलं आहे. यात 'माझं अंगण रणांगण' अशी घोषणा देत पक्षातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या घराबाहेरच फलक, काळे झेंडे दाखवत सरकारचा निषेध करावा, असं आवाहन पक्षातर्फे करण्यात आलं आहे. याला प्रत्युत्तर देत महाआघाडीचे समर्थक देखील सोशल मिडीयात भाजपच्या या आंदोलनाची खिल्ली उडविताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी याला प्रत्युत्तर म्हणून सोशल मीडियावर भाजपला लक्ष्य केले आहे. 

दरम्यान, महाविकासआघाडीच्या सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणार्या खासदार संजय राऊत यांच्या नावाने सोशल मीडियात 'सौ दाऊद, एक राऊत असा' ग्रुप फेसबुकवरती सक्रीय आहे. या ग्रुपवरून सध्या भाजपच्या आंदोलनावरती निशाणा साधला जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तसेच या ग्रुपवरून अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. जे भाजपच्या या आंदोलनाची खिल्ली उडविताना दिसत आहेत. ''मर्द अंगणात नाही रणांगणात युद्ध करतात, अंगणात बायका मंगळागाैर खेळतात'' अशा प्रकारचे भाजपला टारगेट करणारे मीम्स सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या वरून आता भाजपा आणि शिवसेना यांचे सोशल मीडियामध्ये देखील युद्ध सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. 

सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप 
सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या मीम्सवरून या भाजप-महाविकासआघाडीचे युद्ध सोशल मीडियावरच जास्त रंगताना दिसत आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवरून भाजप कार्यकर्त्यांनी 'कोरोना' नियंत्रणासाठी असलेल्या ढिसाळ नियोजनावरून ठाकरे सरकारला जाब विचारला. तर महाविकासआघाडी सरकार समर्थकांनी भाजपवर पलटवार करत अनेक प्रकारचे मीम्स व्हायरल करत भाजप नेते व आंदोलनाची खिल्ली उडविली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख्याने लक्ष्य केल्याचे दिसत आहे. 

भाजपच्या आंदोलनादिवशीच महाविकास आघाडीकडून भाजपवरच हल्लाबोल करण्यात येत आहे. तीनही पक्षांनी एकत्र येऊन ट्विटरवर #महाराष्ट्रद्रोहीBJP असा हॅशटॅग ट्रेंड करुन त्यावर भाजपला ट्रोल केले जात आहे. देशभरात सध्या हा हॅशटॅग ट्रेंड होत असून, तो सध्यातरी दहाव्या क्रमांकावर आहे. आजवर ट्विटर हे भाजपचे रणांगण समजले जात होते, मात्र महाविकास आघाडीच्या पक्षांनी आता त्यावर स्वतःची पकड मिळवली असल्याचे दिसत आहे .

दरम्यान, या कोरोनाच्या काळात महाविकासआघाडी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत भाजपनं राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. आता संदर्भात पहिल्यांदाच पक्षानं आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या आंदोलनात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील प्रदेश मुख्यालयात सहभागी झाले आहेत. तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरमधून हे आंदोलन करत आहेत. पुण्यात देखील या आंदोलनाचे पडसाद उमडताना दिसत आहेत. पुणे शहरात शिवसेनेने भगवे झेंडे लावून ठाकरे सरकारचे समर्थन केले. तसेच भाजपच्या नेत्यांनी देखील आपल्या घरापुढील अंगणात येत काळे झेंडे दाखवून आंदेलन केले.

हेही वाचा- कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलंय आनंदनगर

देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या चाचण्या पुरेशा संख्येनं होत नसल्याची टीका केली होती. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढतो आहे. अशावेळी विशेषता मुंबईसारख्या शहरांमध्ये दररोज किमान दहा हजार चाचण्या झाल्या पाहिजेत अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईसारख्या शहरात सध्या रोज साडेतीन ते चार हजार चाचण्या केल्या जात असल्याची माहितीदेखील फडणवीस यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं आजच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जे तंत्रविद्या करतात तेच काळे कपडे घालतात अशी बोचरी टीका काल केली होती. त्यासोबतच कोरोनाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार बरखास्त करा अशी भाजपची भूमिका असेल, तर पहिले गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश ही राज्य सरकारं बरखास्त करावीत आणि त्यानंतरच महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याची भाषा करावी अशी टीका देखील जयंत पाटील यांनी केली होती.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

इतकंच नाही तर आजच्या सामना'च्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी देखील भाजपच्या या आंदोलनावर टीका केली आहे. “महाराष्ट्र प्रकाशमान तेजस्वी करण्याचे युद्ध सुरू असताना राज्य काळे करण्याचे आंदोलन सुरू झालेले आहे. डोमकावळ्यांचे फडफडणे औट घटकेचे ठरेल याविषयी आमच्या मनात शंका नाही. पाटील फडणवीसांनी भाग राखून वागावे बोलावे. शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो पण विरोधकांत शहाणपण उरले आहे काय?” असा सवाल आजच्या सामनातून विचारलेला आहे.

Image may contain: 1 person, text

तसंच भाजपचं आंदोलन असताना त्याला छेद देण्यासाठी आजच्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसनं 'राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय' हे अभियान सुरु केलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील पाच लाख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या निमित्तानं राज्य सरकार विरोधात भाजप अशी लढाई राज्यात सुरू झालेली पाहायला मिळत आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikasaghadi criticizes BJP