कंत्राटींवर ‘महावितरण’ची मदार

Mahavitaran
Mahavitaran

पिंपरी - शहरात वाढणाऱ्या बांधकामांबरोबरच ‘महावितरण’चे ग्राहकही वाढत आहेत; परंतु त्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढलेली नसल्याने ग्राहकांना वेळेत सेवा देण्यासाठी खासगी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांचा आधार ‘महावितरण’ला घ्यावा लागत आहे. 

शहरातील घरगुती ग्राहकांसह व्यावसायिक (वाणिज्य) व औद्योगिक ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी ‘महावितरण’चे पिंपरी व भोसरी अशी दोन विभागीय कार्यालये आहेत. त्याअंतर्गत अनुक्रमे सांगवी, बिजलीनगर, ताथवडे आणि भोसरी, आकुर्डी, प्राधिकरण असे उपविभाग आहेत. शहरात गेल्या आठ-दहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बांधकामे वाढत आहेत. यात गृहनिर्माण सोसायट्यांबरोबरच व्यावसायिक कॉम्प्लेक्‍सची संख्या मोठी आहे. यात विशेषतः वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, चिखली, मोशी, चऱ्होली आदी गावांमध्ये होणाऱ्या बांधकामांची पर्यायाने ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे; परंतु पिंपरीच्या तुलनेने भोसरी विभागात औद्योगिक ग्राहकांची संख्या सहा पटीने अधिक असल्याने भोसरी विभागावर औद्योगिक भार सर्वाधिक आहे. मात्र, दोन्ही विभागांतील वाढते वीजग्राहक पाहता त्या तुलनेत महावितरण कर्मचाऱ्यांची संख्या तुटपुंजी आहे. दोन्ही विभाग मिळून वीजग्राहकांची संख्या सात लाखांपर्यंत असून, कर्मचारी केवळ आठशेच्या जवळपास आहेत. साधारणतः पाच वर्षांपासून महावितरणमध्ये कर्मचारी भरती झालेली नाही. उलट वयोमानानुसार बहुतांश कर्मचारी दरवर्षी सेवानिवृत्त होत आहेत. ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी त्यांना अखंडित वीजसेवा देण्यासाठी ‘महावितरण’ला खासगी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांचा आधार घ्यावा लागतो. 

याबाबत भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. गवारी म्हणाले, ‘‘वीजग्राहक वाढत आहेत. मात्र, त्यांना वेळेत सेवा दिली जात असल्याने व तक्रारींचे निराकरण वेळेत केले जात असल्याने ग्राहक समाधानी आहेत.’’

वीजग्राहकांना वेळेत सेवा देण्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता असते. त्यासाठी आम्ही ठराविक कालावधीसाठी निविदा प्रक्रिया राबवून खासगी कंत्राटदारांना कुशल कर्मचारी पुरविण्याचे आवाहन करतो. त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत विद्युतविषयक कामे पूर्ण करून ग्राहकांना सेवा पुरविली जात आहे.  
- शिवाजी वायफळकर, कार्यकारी अभियंता, महावितरण, पिंपरी विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com