फ्यूज गेला असेल तर अंधारात बसा

रवींद्र जगधने
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पिंपरी - ‘या मोबाईलवर फोन करू नका, हा माझा पर्सनल नंबर आहे.’’ ‘‘एक फ्यूज गेली असेल तर अंधारात बसा.’’ ‘‘काम सुरू आहे, जरा दम धरा.’’ ही वक्तव्ये आहेत, महावितरण अभियंते व कर्मचाऱ्यांची.  

पिंपरी - ‘या मोबाईलवर फोन करू नका, हा माझा पर्सनल नंबर आहे.’’ ‘‘एक फ्यूज गेली असेल तर अंधारात बसा.’’ ‘‘काम सुरू आहे, जरा दम धरा.’’ ही वक्तव्ये आहेत, महावितरण अभियंते व कर्मचाऱ्यांची.  

वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या शहरात नित्याचीच असून याबाबत महावितरण कार्यालयात संपर्क केल्यास फोन उचलला जात नाही किंवा तो अनेकदा बंद असतो. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यास हा माझा खासगी नंबर आहे, असे ग्राहकाला सुनावले जाते किंवा काहींनी तक्रार निवारण टोल-फ्री क्रमांकावर फोन केल्यास तक्रार नोंदवली जाते. मात्र, परिसरातील इतर भागाचा वीजपुरवठा सुरू असल्यास, सिंगल फ्यूज गेला असल्याचे सांगितले जाते. जर रात्री हा प्रकार घडल्यास, दुरुस्ती सकाळी होईल. ‘‘अंधारात बसा’’ असाही सल्ला दिला जातो, अशी माहिती नागरिक देत आहेत. 

इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या जास्त आहे. पावसाच्या अगोदर देखभाल दुरुस्ती कामे करणे अपेक्षित असताना ती केली जात नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तर रस्त्यांच्या विविध कारणांसाठी होणाऱ्या खोदाईमुळे वीज वाहिनीच्या केबल तुटतात किंवा खराब होतात. त्यात पावसाचे पाणी जाऊन शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याची पावसाळ्यात समस्या जास्त असल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

महावितरण व महापालिका प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेक मोबाईल टॉवरला बॅटरी नसल्याने मोबाईल व इंटरनेटही बंद पडते. 

काळेवाडी, रहाटणी, ताथवडे, भोसरी आदी भागांत वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात असून, महावितरणचा काळेवाडी विभागाचा फोनच बंद पडलेला आहे. महावितरण कर्मचाऱ्यांना याबाबत फोन केल्यास उद्धट भाषेत उत्तरे दिली जातात. तर काही सुजाण नागरिकांनी कायद्याची भाषा सांगितल्यास अधिकारी सरकारी कर्मचाऱ्याला अरेरावी किंवा सरकारी कामात अडथळा आणण्याबाबत पोलिस तक्रार करण्याचीही धमकी देत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

२०१४ पासून स्थानिक तक्रार निवारण क्रमांक कायमचे बंद केले आहेत. त्याऐवजी २४ तास सुरू असलेल्या राष्ट्रीय टोल-फ्री १९१२, १९१२० किंवा महावितरण १८००१०२३४३५, १८००२३३३४३५ या क्रमांकावर तक्रार करता येते. तक्रारीनंतर तीन-चार मिनिटांत ती संबंधित उपअभियंत्याकडे पाठवली जाते. तेथून पुढे प्रशासन तातडीने दखल घेते. 
- निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

Web Title: mahavitaran electricity fuse darkness