महेश मोतेवारच्या मुलाला, भाच्याला अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पुणे - गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी समृद्धी जीवन मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे प्रमुख महेश मोतेवार याच्या मुलाला आणि भाच्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना 18 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी दिला आहे. 

पुणे - गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी समृद्धी जीवन मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे प्रमुख महेश मोतेवार याच्या मुलाला आणि भाच्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना 18 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी दिला आहे. 

अभिषेक महेश मोतेवार (रा. गणराज हाइट्‌स, बालाजीनगर, धनकवडी) आणि प्रसाद किशोर पारसवार (रा. कृष्णामाई सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) अशी त्यांची नावे आहेत. महेश मोतेवार आणि त्याची पत्नी लीना या दोघांनाही यापूर्वी या प्रकरणात अटक केली असून, दोघे तुरुंगात आहेत. त्याबरोबरच महेंद्र गाडे, सुनीता थोरात या दोघांनाही यापूर्वी या गुन्ह्यात अटक केली आहे. या प्रकरणात आणखी 20 जणांवर गुन्हा दाखल आहे. किरण शांतिकुमार दीक्षित (रा. दत्तवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. 

या प्रकरणात मोतेवार यांचा मुलगा अभिषेक आणि भाची पूजा कामले या दोघांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला होता. समृद्ध जीवन फूड्‌स इंडिया कंपनीला सेबीने गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारण्यास बंदी घातली. त्या वेळी सोसायटीमार्फत गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारण्यात आली आहे. संचालक मंडळ, पदाधिकाऱ्यांनी मिळून आकर्षक परतावा देण्याच्या आमिषाने 30 जुलै 2015 ते 28 सप्टेंबर 2016 या कालावधीत समृद्धी जीवन मल्टिस्टेट मल्टी पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीत गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. नागरिकांनी विश्‍वासाने गुंतवणूक केलेल्या रकमेचा अपहार केला. या गुन्ह्यात आतापर्यंत तब्बल दोन कोटी 18 लाख 83 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी महेश मोतेवार याच्या मुलाला आणि भाच्याला अटक करून, पोलिसांनी न्यायालयात हजर केले. विशेष सरकारी वकील सुनील हांडे यांनी त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली. 

Web Title: mahesh motewar son arrested