ज्येष्ठ महिलेस मारहाण करून मोलकरणीनेच लुबाडले दागिने 

दत्ता म्हसकर
रविवार, 28 जुलै 2019

- भरदिवसा घरकाम करणाऱ्या महिलेने ज्येष्ठ महिलेस मारहाण करून दागिने लुबाडले

-शहरातील गजबजलेल्या बाजार पेठेतील वस्तीत भर दिवसा झालेल्या या घटनेने जुन्नरमध्ये एकच खळबळ उडाली ​

जुन्नर : भरदिवसा घरकाम करणाऱ्या महिलेने ज्येष्ठ महिलेस मारहाण करून दागिने लुबाडल्याची घटना समोर आली आहे. नलिनी दत्तात्रय गाटे (वय ७६. रा. सदाबाजार पेठ,जुन्नर ) या ज्येष्ठ नागरिक महिलेस मारहाण करून त्यांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. 

शहरातील गजबजलेल्या बाजार पेठेतील वस्तीत भर दिवसा झालेल्या या घटनेने जुन्नरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गाटे यांच्या राहत्या घरात धुणीभांडी करणार्‍या महिलेनेच हे कृत्य केल्याचे त्यांनी स्वतः पोलिसांना सांगितले. 

पोलिसांनी शोभा शंकर शेटे (रा. सदाबाजार पेठ, जुन्नर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माजी नगरसेवक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. काका गाटे यांच्या नलिनी पत्नी होत. त्या घरात एकट्याच राहतात. शुक्रवार (ता. २६) सकाळी ११ च्या दरम्यान धुणी-भांड्याचे काम करणाऱ्या शोभा शंकर शेटे त्यांच्या घरी कामासाठी आल्या. यावेळी शेटे हिने त्यांचे डोके भिंतीवर आपटुन, तोंडामध्ये रुमाल कोंबून, छातीवर पाय ठेवून, त्यांच्या अंगावरील सोन्याच्या चार बांगड्या, दोन पाटल्या, एक गंठण असे एकूण१०३ ग्रॅम वजनाचे दागिने जबरदस्तीने लंपास केले. 

मारहाणीत जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या धक्क्यातून सावरल्यानंतर त्यांनी शनिवारी जुन्नर पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बेंद्रे पुढील तपास करीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maid stripped of jewelry by beating senior woman