विकासासाठी वाचन संस्कृती टिकवा : डॉ. अरुणा ढेरे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

पुणे : एका समृद्ध समाजाला, विकास करू इच्छिणाऱ्या समाजाला वाचन संस्कृती टिकवली पाहिजे. ग्रंथालये, ग्रंथघरे, ग्रंथविक्री केंद्रे ही ज्ञानकेंद्रे आहेत. या ज्ञानकेंद्रांतून अधिक समृद्ध होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. 

अक्षरधारा बुक गॅलरीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त अक्षरधारा, राजहंस प्रकाशनतर्फे 585 व्या "दीपावली शब्दोत्सवा'चे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. ढेरे बोलत होत्या. या वेळी राजहंस प्रकाशनचे संपादक डॉ. सदानंद बोरसे, मांडके हिअरिंग सर्व्हिसेसच्या डॉ. कल्याणी मांडके, अक्षरधाराचे रमेश राठिवडेकर उपस्थित होते. 

डॉ. ढेरे म्हणाल्या, "सूर्य उगवल्यावर श्रीमंतीची जाणीव करून देतो, दिवाळी ही अशीच ज्ञानकिरणांच्या श्रीमंतीची असावी. ग्रंथ आणि वाचनाशी निगडित उपक्रम समाजाच्या समृद्धीमध्ये मोलाची भूमिका बजावतात.'' 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसिका राठिवडेकर यांनी केले. सूत्रसंचालन सिद्धार्थ बेंद्रे यांनी केले. 
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रेमावरील कविता सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. "गर्द सभोवती रान साजेशी तु तर चाफेकळी,' "आकाश निळे तो हरी अन एक चांदणी ती राधा,' "प्रेम नसावे अटीतटीचे, त्यागाचे ही प्रेम नसावे,' अशा प्रेम कविता सादर करण्यात आल्या. शंभर वर्षांतल्या निवडक प्रेम कवितांचा "गंध प्रीतीचा'' हा कविता अभिवाचन आणि गायनाचा कार्यक्रम अनुराधा मराठे यांनी सादर केला. या वेळी वीणा देव आणि गिरीश ओक यांनी कवितांचे अभिवाचन केले. 
 
Web Title: Maintain reading culture for development Dr Aruna Dhere