चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला

bus
bus

राजगुरूनगर : ब्रेक निकामी... गिअर निकामी... दुर्दैव म्हणजे हँडब्रेकही निकामी.. पण नशीब बलवत्तर म्हणून वाचले प्रवासी! एक पीएमपीएमएल बस शिरोली (ता. खेड) गावाच्या पुणे नाशिक महामार्गावरून चालली असताना ब्रेक निकामी झाल्याने सुमारे पन्नास ते साठ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. पण चालकाने प्रसंगावधान राखून रस्ता सोडून बस सुरक्षित ठिकाणी नेऊन उभी केल्याने मोठा अपघात काल (ता. 23) टळला.

पीएमपीएमएलची पुणे राजगुरूनगर ही बस (क्र. एम एच 12 के क्यू 0182) पुण्याकडून राजगुरुनगरला येत होती. त्यावेळी शिरोली गावच्या हद्दीतील 'चुनदीचा टप्पा' या भागातील उतारावर बसचा 'जॉईंट' तुटून ब्रेक आणि गिअरही निकामी झाल्याचे चालक गणेश नलावडे यांच्या लक्षात आले. त्यानंतर उतार असूनही सुमारे एक किलोमीटर बस भावनांवर नियंत्रण मिळवित चालविली. मात्र पुढे चाललेल्या दोन ट्रक आणि एक मोटार दिसल्यावर त्यांना धडक बसणार या कल्पनेने त्याचा धीर खचला. त्यातही प्रसंगावधान राखत त्याने बस दुभाजकावरून विरुद्ध दिशेला दामटली. सुदैवाने विरुद्ध दिशेने वाहन येत नव्हते. तसेच बसचा वेगही कमी झाला. तोपर्यंत रस्त्याच्या बाजूचे लोक दुभाजकावरील आवाज ऐकून सावध झाले होते. त्यामुळे त्यांनी रस्त्याकडेच्या पुढच्या लोकांना आरडाओरडा करून सावध केले. तेवढ्यात विरुद्ध बाजूने एक एस टी आली. मात्र एस टी. च्या बसचालकाच्या लक्षात समोरचा प्रसंग आल्याने त्याने एस टी नियंत्रित केली. सुदैवाने बसचालकाला पुढे मोकळे शेत दिसले. तेथे त्याने बस नेली आणि चिखलामुळे ती हळूहळू उभी राहिली आणि सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडला. 

ही बस पीएमपीएमएलने ठेकेदाराकडून भाडेतत्त्वावर घेतलेली असल्याची माहिती समजली. पीएमपीएमएल चांगली देखभालदुरुस्ती नसलेल्या बस रस्त्यावर पाठविते अशा तक्रारी यामागेही झाल्या आहेत. त्यांच्या या बेजबाबदारपणामुळे अनेकांचा जीव आज धोक्यात आला होता. 

एक क्षण असा होता की, पुढच्या गाड्यांना बस धडकणार होती. म्हणून मी दुभाजकाला बस घासायचे ठरविले. पण वेगामुळे बसने दुभाजक ओलांडला. पुढे बस कशी थांबवावी असा प्रश्न माझ्यापुढे होता. एखाद्या गाडीवर आदळावी तरी अपघात होणार. झाडावर आदळावी तरी अपघात होणार होता. पण सुदैवाने मोकळे शेत दिसले आणि देवाचे आभार मानले. 
- गणेश नलावडे (बस चालक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com