नारायणगाव : द्राक्ष बागांचे पंचनामे पुर्ण; 434.76 हेक्टर क्षेत्रातील बागांचे नुकसान

रवींद्र पाटे
Thursday, 14 January 2021

बारा तास द्राक्ष घडात पाणी राहिल्याने छाटणी नंतर ९० ते १२० दिवस झालेल्या द्राक्ष घडतील मण्यांना देठाकडील बाजूने चिरा पडून निर्यातक्षम द्राक्ष मतीमोल झाली.

नारायणगाव : कृषि व महसूल विभाग यांच्या वतीने केलेल्या पंचनामा अहवालानुसार सात जानेवारी रोजी  झालेल्या अवेळी पावसामूळे जुन्नर तालुक्यातील सतरा गावातील  ४३४.७६ हेक्टर ( १०८६.९ एकर) क्षेत्रातील परिपक्व अवस्थेतील द्राक्ष बागांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सध्या मिळत असलेल्या बाजारभवाचा विचार करता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे  सुमारे शंभर कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

आर्थिक क्षेत्रात करिअर करायचंय? चिंता करण्याचे कारण नाही 

दरम्यान, ७ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी साडेसहा नंतर तालुक्यातील द्राक्ष पट्टा म्हणून ओळख असलेल्या नारायणगाव, गुंजाळवाडी, वारुळवाडी, येडगाव, खोडद, मांजरवाडी परिसरातील सतरा गावात मुसळधार पाऊस झाला. सुमारे बारा तास द्राक्ष घडात पाणी राहिल्याने छाटणी नंतर ९० ते १२० दिवस झालेल्या द्राक्ष घडतील मण्यांना देठाकडील बाजूने चिरा पडून निर्यातक्षम द्राक्ष मतीमोल झाली.

कृषी अधिकारी प्रमोद बनकर म्हणाले  ग्रामपंचायत निवडणुक नियोजनात व्यस्त असताना तहसीलदार हनुमंत कोळेकर, कृषि अधिकारी बापू रोकडे व मी स्वतः ८ जानेवारी रोजी  नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पहाणी केली. त्यानंतर  तहसीलदार यांनी पंचनामा करण्याचे आदेश आदेश दिले. पंचनामा अहवालानुसार पुणे नाशिक महामार्गाच्या पूर्व व पश्चिम बाजूस असलेल्या सतरा गावातील १०८६.९ एकर क्षेत्रातील परिपक्व अवस्थेतील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले.

सर्वात जास्त नुकसान गुंजाळवाडी ( १२५ हेक्टर), नारायणगाव ( ११२ हेक्टर),वारुळवाडी( ६३.५ हेक्टर) येडगाव ( ४३.५ हेक्टर), पिंपळगाव तर्फे नारायणगाव((३१.४१ हेक्टर) या गावातील द्राक्ष बागांचे झाले.२५ ऑक्टोबर नंतर छाटणी झालेल्या व थिनिंग सुरू असलेल्या द्राक्ष बागांचे त्या तुलनेत कमी नुकसान झाल्याने या बागांचे पंचनामे केले नाहीत. बुरशी नाशकांची फवारणी करून या बागा वाचवण्यासाठी द्राक्ष उत्पादक प्रयत्नशील आहेत. घडाभोवती लावलेले कागद पावसामुळे भिजल्याने दुबार कागद लावण्याचे काम करावे लागले आहे. मात्र या मुळे फवारणीच्या भांडवली खर्चात एकरी सुमारे चाळीस हजार रुपयांची वाढ होणार आहे.

पुणेकरांच्या खिशाला कात्री; का होतेय पेट्रोल- डिझेलच्या भावात वाढ?

द्राक्ष बागेला एकरी भांडवली  सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च होतो. पंचनामा अहवालानुसार नुकसान झालेल्या १०८६.९ एकर क्षेत्रातील परिपक्व अवस्थेतील द्राक्ष बागांचा सुमारे ३८ कोटी रुपयांचा भांडवली खर्च वाया गेला आहे. नुकसान झालेल्या बागांतील निर्यातक्षम द्राक्षांचे करार प्रतवारी नुसार प्रतिकिलो १०० रुपये ते १३५ रुपये या दराने झाले होते. या मुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे सुमारे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शासकीय नियमानुसार नुकसानग्रस्त सतरा गावांतील बागांना एकरी ७ हजार २०० रुपये( हेक्टरी १८ हजार रुपये) या दराने ७८ लाख २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळेल. भांडवली खर्च व झालेले नुकसान पहाता ही नुकसान भरपाई म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे. -हरीभाऊ वायकर (तालुका द्राक्ष उत्पादक संघटनेचे उपाध्यक्ष)

(संपादन : सागर डी. शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: major damage to vineyards due to rains