पुण्यातील मेजर नायर हुतात्मा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

पुणे/ खडकवासला - जम्मू- काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी शुक्रवारी घडविलेल्या स्फोटात पुण्यातील मेजर शशिधरन नायर (वय ३३, रा. मुकाईनगर, खडकवासला) यांच्यासह एक जवान हुतात्मा झाला. लष्कराच्या फर्स्ट गोरखा रायफल्समध्ये ते कार्यरत होते.

राजौरीमधील नौशेरा भागातील रूपमती आणि पुख्खरणी या ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडीच्या स्फोटात नायर यांच्यासह रायफलमन जवान गुरूंग (वय २४, रा. पश्‍चिम बंगाल) हे हुतात्मा झाले. 

पुणे/ खडकवासला - जम्मू- काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी शुक्रवारी घडविलेल्या स्फोटात पुण्यातील मेजर शशिधरन नायर (वय ३३, रा. मुकाईनगर, खडकवासला) यांच्यासह एक जवान हुतात्मा झाला. लष्कराच्या फर्स्ट गोरखा रायफल्समध्ये ते कार्यरत होते.

राजौरीमधील नौशेरा भागातील रूपमती आणि पुख्खरणी या ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडीच्या स्फोटात नायर यांच्यासह रायफलमन जवान गुरूंग (वय २४, रा. पश्‍चिम बंगाल) हे हुतात्मा झाले. 

दरम्यान, शनिवारी संध्याकाळी नायर यांचा मृतदेह लष्करी विमानाने पुण्यात आणण्यात आला. घोरपडी येथील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे त्यांना लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे मानवंदना देण्यात आली. मेजर जनरल एन. एस. लांबा यांनी नायर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर लष्करी अधिकारी, सैनिक व नायर कुटुंबीय तसेच नागरिकांनीही त्यांना आदरांजली वाहिली. पत्नी तृप्ती या आजारी असल्याने खडकी येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना व्हीलचेअरवरूनच या ठिकाणी आणण्यात आले होते. 

नायर यांचे मूळ गाव केरळ राज्यातील एर्णाकुलम जिल्ह्यामधील चेंगामनाड हे आहे. ते गेल्या ३० वर्षांपासून येथे राहतात. त्यांचे वडील नोकरीनिमित्त खडकवासला येथे आले. केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेत ते रोखपाल होते. दहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांची आई लता या गृहिणी आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव तृप्ती असून, त्या संगणक अभियंता आहेत. काही दिवसांपासून त्यांना दिव्यांगत्व आले आहे. बहीण सीना या पदवीधर आहेत.

नायर हे ४० दिवसांची सुटी संपवून, ३ जानेवारीला ते सीमेवर रुजू झाले होते.
नायर यांचा जन्म खडकवासला येथे १९८५ मध्ये झाला. येथील केंद्रीय विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी एनसीसीत भाग घेतला. तेथे त्यांना उत्कृष्ट स्नातक म्हणून गौरविले होते. पदवीनंतर त्यांनी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी (आयएमए) मधून प्रशिक्षण पूर्ण केले. १० डिसेंबर २००७ रोजी ते सैन्यात दाखल झाले होते. पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. 

अनेकांना अश्रू अनावर 
शशीधरन हुतात्मा झाल्याची बातमी समजताच नातेवाईक व स्थानिक ग्रामस्थांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली. अनेकांना अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या हौतात्म्यामुळे खडकवासला परिसरावर शोककळा पसरली होती. त्यांच्या एका नातेवाइकाने आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘‘शशीधरनने दहावीनंतर सैन्यात जाण्याचे ठरवले. तो शिक्षण घेत असताना महाविद्यालयात सायकलने जायचा. महाविद्यालय ते घर हे अंतर जवळपास २० किलोमीटर होते.’’

शशिधरनला व्यायामाची प्रचंड आवड होती. आमच्या मित्रांमध्ये तो सर्वांचाच लाडका होता. पहिल्यापासून त्याच्या मनात देशप्रेम असल्याने लष्करात जाण्याचा संकल्प त्याने केला होता. त्याला श्रद्धांजली अर्पण करण्याची कधी वेळ येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, असे मेजर शशिधरन यांचे वर्गमित्र बाळू सोनटक्के यांनी सांगितले.

वैकुंठमध्ये आज अंत्यसंस्कार
नायर यांचा मृतदेह शनिवारी रात्री ‘एनडीए’तील शवागारात ठेवला जाणार आहे. रविवारी (ता. १३) सकाळी सातला खडकवासला येथील मुकाईनगर परिसरातील घरी तो आणण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. 

Web Title: Major Shashidharan Nayar Martyr