एकसष्टीला दादांना मुख्यमंत्रीपदाची भेट द्या; धनंजय मुंडे यांचे भावनिक आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

शहराच्या विकासाची वीट रचणाऱ्या अजित दादांना पिंपरी-चिंचवडकरांनी खाली पाहायल लावलं, अशी खंत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे फर्डे वक्ते धनजंय मुंडे यांनी सोमवारी रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये व्यक्त केली. शहर बेस्ट करूनही पक्ष व दादांचा पालिका निवडणुकीत पराभव झाल्याची पार्श्वभूमी मुंडे यांच्या या वक्तव्यामागे होती.

पिंपरी : शहराच्या विकासाची वीट रचणाऱ्या अजित दादांना पिंपरी-चिंचवडकरांनी खाली पाहायल लावलं, अशी खंत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे फर्डे वक्ते धनजंय मुंडे यांनी सोमवारी रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये व्यक्त केली. शहर बेस्ट करूनही पक्ष व दादांचा पालिका निवडणुकीत पराभव झाल्याची पार्श्वभूमी मुंडे यांच्या या वक्तव्यामागे होती. मात्र, ही कसर दादांना मुख्यमंत्री करून भरून काढा, त्यांच्या एकसष्ठीला ही भेट द्या, दादांची एकदा आठवण करा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे युवा नेते माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शहराच्या जडणघडणीत हातभार लावणाऱ्या मान्यवरांचा त्यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या शिलेदारांच्या कर्तृत्व असलेल्या पिंपरीचे शिलेदार या पुस्तकाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांची ग्रंथतुला यावेळी करण्यात आली. शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिलाध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ,भाऊसाहेब भोईर,युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदी व्यासपीठावर होते. 

पक्ष सोडून गेलेल्यांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे होती, अशी माझी अपेक्षा होती, असे मुंडे यांनी सांगितले. त्यांचा रोख हा चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप व भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्याकडे होता. ते म्हणाले, ''पिंपरी-चिंचवडच्या जडणघडणीत शरद पवार आणि अजित पवार अशी दोनच नावे घेतली जातात. शहराच्या उभारणीत एका पिढीने (शरद पवार) पाया रचून (सुरवात करून) दुसऱ्या पिढीने (अजित पवार) कळस चढविल्याचे जगात पिंपरी-चिंचवडशिवाय दुसरे उदाहरण नाही.एवढेच नाही,तर त्यांनी शहरवासियांचे दरडोई उत्पन्नही इतरांच्या तुलनेत खूप वाढवले. मात्र, मतांच्या निवडणुकीत त्यांना शहरवासियांनी खाली मान घालायला लावली, हे दुर्दैव आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: make a ajit pawar as a cm on his 61st Birthday appeal Dhanjay munde