कचरा प्रक्रिया प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून देणार  - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

पुणे - ""कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांची क्षमता वाढविण्याचे नियोजन करावे. अशा प्रकल्पांसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू,'' असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी दिले. नवे प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकार सहकार्य करेन, असेही ते म्हणाले. 

पुणे - ""कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांची क्षमता वाढविण्याचे नियोजन करावे. अशा प्रकल्पांसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू,'' असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी दिले. नवे प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकार सहकार्य करेन, असेही ते म्हणाले. 

फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोला आग लागल्यानंतर शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला होता. त्यावर तोडगा निघाला असला तरी, कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांची संख्या, त्यांची क्षमता वाढविण्याची सूचना पालकमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला केली होती. या पार्श्‍वभूमीवर बापट यांनी विविध भागांतील प्रक्रिया प्रकल्पांना भेटी देऊन पाहणी केली. महापौर मुक्ता टिळक, पालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह पालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप उपस्थित होते. प्रकल्पांची मूळ क्षमता, सद्यःस्थिती आणि भविष्यातील नियोजन याचा आढावा पालकमंत्र्यांनी या वेळी घेतला. 

ते म्हणाले, ""शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, त्यासाठी नवे प्रकल्प आणि त्यांची परिणामकारकता महत्त्वाची आहे. सध्या ज्या प्रकल्पांची क्षमता अधिक आहेत, अशा प्रकल्पांची व्याप्ती वाढविण्यासाठी जागा दिली जाईल; तसेच अन्य बाबींचीही पूर्तता केली जाईल. त्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर सहकार्य करण्यात येईल.'' 

जगताप म्हणाले, ""अनेक प्रकल्प त्यांच्या क्षमतेनुसार कार्यान्वित असून, नव्या प्रकल्पांची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. नवे आणि अधिक क्षमतेचे प्रकल्प उभारताना छोट्या क्षमतेच्या प्रकल्पांवर भर राहणार आहे. याबाबत पालकमंत्र्यांना सर्व माहिती दिली आहे.'' 

Web Title: Make available space for waste processing projects