#FreeParking मॉलमध्ये करा पार्किंग मोफत

#FreeParking मॉलमध्ये करा पार्किंग मोफत

पुणे - पुणे शहर, उपनगरांतील मॉल आणि मल्टिप्लेक्‍समध्ये खरेदीसाठी येणाऱ्या लोकांना मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने पावले उचलली असून, वाहनचालकांकडून पार्किंग शुल्क घेऊ नये, असा ठराव महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने शुक्रवारी (ता. १४) केला. त्यानुसार पार्किंग शुल्क घेणाऱ्या मॉल व्यवस्थापनाविरोधात कारवाई होणार आहे. मात्र, या निर्णयाची खरोखरीच अंमलबजावणी होणार का ? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. 

शहरातील मॉल  व मल्टिप्लेक्स ३९

‘‘मॉल आणि मल्टिप्लेक्‍समध्ये पार्किंगसाठी तासानुसार भरमसाट शुल्क घेतले जात असल्याने वाहनचालक-मालकांची गैरसोय होत आहे. अशा प्रकारे बेकायदा शुल्क आकारणी होत असल्याने मोफत पार्किंग पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’’ असे शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी सांगितले. 

 शहरात सध्य ३९ मॉल आणि मल्टिप्लेक्‍स असून, त्याठिकाणचे पार्किंग शुल्क हे २० ते १०० रुपयांपर्यंत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आहेत. बहुतांश मॉलमध्ये दिवसभराऐवजी प्रतितासानुसार पैसे घेतले जातात. मुळात, खरेदीसाठी येणाऱ्या लोकांकडून अशा प्रकारे पार्किंग शुल्क वसूल करणे चुकीचे आहे. तरीही, मॉल व्यवस्थापनांनी आपापल्या सोयीनुसार पार्किंग शुल्क निश्‍चित केले आहेत. मॉलमध्ये पार्किंग शुल्क आकारू नये, असा ठराव समितीत मांडण्यात आला. त्यावर चर्चा होऊन तो मंजूर करण्यात आला. 

मॉल आणि मल्टिप्लेक्‍समध्ये मोफत पार्किंग सुविधा हवी; परंतु तेथे वाहनांच्या स्वरूपानुसार शुल्क ठरवितात. ठेकेदारामार्फत वाहनचालकांची अडवणूक करून पैसे वसूल केले जातात. नव्या निर्णयानुसार पार्किंग शुल्क आकारणाऱ्या मॉलला नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतर कठोर कारवाईची सूचना विविध खात्यांना केली आहे.
- अमोल बालवडकर, अध्यक्ष, शहर सुधारणा समिती, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com