करा उन्हाळा सुसह्य!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 एप्रिल 2019

आज पारा आणखी उसळण्याची शक्‍यता
गेली दोन दिवस शहरात काहीसे ढगाळ वातावरण असले, तरीही तापमानाचा पारा ४२.६ अंश सेल्सिअसपर्यंत गेला होता. रविवारीही (ता. २७) शहरात आकाश अंशत: ढगाळ राहणार असून, तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. उन्हाचा हा कडाका सोमवारपासून (ता.२८) कमी होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. शनिवारी पुण्यात ४२.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

पुणे - तुम्हाला खूप थकवा जाणवतोय, चक्कर येतेय, त्वचा लालसर होतेय, डोळे चुरचुरताहेत...तर मग त्वरित डॉक्‍टरांकडे जा! यंदा अधिक तीव्रतेने जाणवणाऱ्या उन्हाच्या झळांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उष्माघात किंवा उन्हामुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे जाणवू लागली असतील, तर लागलीच वैद्यकीय सल्ला घ्या, असा सल्ला शहरातील तज्ज्ञांनी दिला आहे.

यंदा उन्हाचा चटका नेहमीपेक्षा अधिक जाणवत असल्याने बाहेर पडताना पुरेसे पाणी सोबत ठेवा, टोपी, स्कार्प आवर्जून वापरा, असा सल्ला डॉक्‍टर देत आहेत. शहरात गेल्या दोन दिवसांपासून सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा कडाका जाणवत आहे. शहरात मार्चपासून उन्हाचा चटका जाणवायला सुरवात झाली. मात्र गेल्या काही दिवसांत पुण्यातील तापमानाने चाळिशी पार केली आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास शरीरावर परिणाम होतात. हा त्रास किरकोळ किंवा गंभीर स्वरूपाचा असतो. किरकोळ त्रासात शरीरावर रॅश उमटणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे असे विकार होतात. गंभीर प्रकारात उष्माघाताचा समावेश होतो. यात मृत्यूदेखील होऊ शकतो.
- डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग, महाराष्ट्र

या व्यक्तींना होऊ शकतो त्रास
  कष्टाची कामे करणारे कामगार
  हृदयरोग असलेले नागरिक
  वृद्ध नागरिक आणि लहान मुले
  गर्भवती महिला
  अनियंत्रित मधुमेह
  स्थूल नागरिक आणि पुरेशी झोप न झालेले

उष्णता विकार व लक्षणे 
  सनबर्न - कातडी लालसर होणे, सूज येणे, वेदना, ताप, आणि डोकेदुखी 
  स्नायूंना गोळे येणे (हीट क्रॅम्पस) - हातापायाला गोळे, पोटाच्या स्नायूत मुरडा, खूप घाम. 
  प्रचंड थकवा (हीट एक्‍झॉस्टेशन) - खूप घाम, थकवा, कातडी थंडगार, नाडीचे ठोके मंद, डोकेदुखी, चक्कर, उलटी. 
  उष्माघात (हीट स्ट्रोक) - त्वचा गरम आणि कोरडी, नाडीचे ठोके वेगात, घाम नाही, अर्धवट शुद्धी.

अशी घ्या काळजी 
  पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा.
  हलक्‍या वजनाचे, फिकट रंगाचे, सैल कपडे वापरा. 
  उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा.
  उन्हात जाताना टोपीखाली ओलसर कपडा ठेवा
  पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवा.
  ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.

हे करू नका
  उन्हाच्या वेळेत घराबाहेर पडू नका
  कष्टाची कामे उन्हात करू नका
  पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका
  गडद रंगांचे कपडे वापरू नका
  प्रथिनयुक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नका

लहान मुलांकडे द्या लक्ष 
पुणे - भर उन्हात तान्ह्या बाळाला घेऊन घराबाहेर पडत असाल, तर मग थांबा ! उन्हाच्या कडाक्‍यात घराबाहेर पडताना बाळाला सोबत नेणे शक्‍यतो टाळा, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले यांनी दिला आहे.

तीन वर्षे वयापर्यंत
  बाळाला स्तनपान करण्यापूर्वी गार पाण्याने पुसून घ्या
  तेलाने अधिकाधिक मसाज करणे टाळा
  बाळाला एसी किंवा कूलरऐवजी हवेशीर ठेवा
  शरीराचे वाढते तापमान कमी करण्यासाठी पाण्याने पुसून घ्या
  या काळात भूक कमी झालेली असल्यामुळे पेयपदार्थांवर भर द्या
  पिण्यासाठी स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी वापरा

तीन ते आठ वर्षे वयोगट
  डोळे स्वच्छ पाण्याने धूत राहा
  अतिगार पदार्थ त्रासदायक ठरू शकतात
  माठातील गार पाणी देणे चांगले
  डोळे अथवा त्वचा लाल झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्या

आठ ते बारा वर्षे वयोगट
  बाहेरील शीतपेय देणे टाळा
  उन्हापासून संरक्षण होईल, असे कपडे वापरा
  ताक, कोकम, नारळ पाणी पिणे योग्य
  उन्हात बराच काळ खेळणार नाही, याची घ्या काळजी
  बाहेरील पाणी आणि खाद्यपदार्थांचे सेवन टाळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make summer graceful Helthcare Temperature Childcare