हिवताप, डेंगी सरकारच्या रडारवर - डॉ. हर्ष वर्धन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

डेंगीवर लवकरच औषध
सिरम इन्स्टिट्यूटतर्फे डेंगीवर नवीन औषध विकसित करण्यात येत आहे. त्या औषधाच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. त्याच्या यशानंतर लवकरच हे औषध बाजारात येईल, अशी माहिती सायरस पूनावाला यांनी दिली.

पुणे - 'पोलिओपाठोपाठ हिवतापही देशातून हद्दपार करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. तसेच, डेंगीचा प्रादुर्भावही कमी करण्यास प्राधान्यक्रम देण्यात आला आहे,'' असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी येथे दिली.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एसआयआय) लसनिर्मिती प्रकल्पाचे उद्‌घाटन डॉ. वर्धन यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी "एसआयआय'चे प्रमुख सायरस पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला, नताशा पूनावाला व डॉ. वर्धन यांच्या पत्नी नूतन गोयल उपस्थित होत्या.

डॉ. वर्धन म्हणाले, 'हिवताप आणि डेंगी हे कीटकजन्य आजार आता आरोग्य खात्याच्या रडारवर आहेत. विषाणूंच्या संसर्ग झालेल्या डासांपासून हिवतापचा फैलाव होतो. या आजाराला हद्दपार करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. तसेच, कुष्ठरोगनिर्मूलनासाठी प्राधान्य देण्यात येत आहे.''

'आंतरराष्ट्रीय पातळीवर 2030पर्यंत क्षयरोग हद्दपार करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. पण, सरकारला पुढील सहा वर्षांमध्ये म्हणजे 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त देश करायचा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 2014 मध्ये झालेल्या सभेत "एन्ड टीबी स्ट्रॅटेजी' स्वीकारली आहे. त्यानुसार 2030 पर्यंत क्षयरोग जगातून हद्दपार करण्यात येणार आहे,'' असेही त्यांनी स्पष्ट केले.

आयुष्मान भारत योजनेबद्दल बोलताना डॉ. वर्धन म्हणाले, 'या योजनेतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कोणावरही दया केली जाणार नाही. याबद्दल सरकारने "झिरो टॉलरन्स'चे धोरण अवलंबले आहे. यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास येताच त्यावर आम्ही कठोर कारवाई करू.''

आदर पूनावाला म्हणाले, 'देशात सध्या मंदीचे वातावरण आहे. पण, अशा वातावरणातही औषध निर्माण क्षेत्राची प्रगती होत आहे. सिरम इन्स्टिट्यूट नवीन औषध प्रकल्पात तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यातून रोजगारनिर्मितीही होणार आहे. तसेच, डोसनिर्मितीची क्षमता 50 कोटींनी वाढेल.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malaria Dengue Government Medicine Harsh Vardhan