मालदीव स्फोटाचा सूत्रधार उपचारासाठी पुण्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

मालदीवमध्ये बॉम्बस्फोटप्रकरणी खटला भरण्यात आलेले मालदीवचे माजी उपाध्यक्ष अहमद अदीब यांना वैद्यकीय उपचारांसाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अहमद अदीब पळून जाण्याची शक्यता असल्यामुळे मालदीव सरकारने भारताच्या मदतीने येथे सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

पुणे : मालदीवमध्ये बॉम्बस्फोटप्रकरणी खटला भरण्यात आलेले मालदीवचे माजी उपाध्यक्ष अहमद अदीब यांना वैद्यकीय उपचारांसाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अहमद अदीब पळून जाण्याची शक्यता असल्यामुळे मालदीव सरकारने भारताच्या मदतीने येथे सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. आधी त्यांना कोथरूडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कोरेगाव पार्क येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते.

मालदीवमध्ये 28 सप्टेंबर 2015 रोजी तेथील तत्कालीन राष्ट्रपती यामीन अब्दुल गयूम यांच्या बोटीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यानंतर मालदीव सरकारने तत्कालीन उपराष्ट्रपती अहमद अदीब यांच्याविरुद्ध राष्ट्रपतींच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी खटला भरला. त्यामुळे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मात्र, अहमद अदीब यांनी आपल्याला डोळ्याचा ग्लोऊकोमा हा आजार असल्याचे तेथील सरकारला सांगितले होते.

त्यामुळे मालदीव सरकारने भारत सरकारशी संपर्क साधून त्यांना 14 जून रोजी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी पाठवले आहे. त्यानंतर गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्या डोळ्याच्या आजारावर पुण्यात उपचार सुरू आहेत. त्याप्रमाणेच त्यांच्या डोळ्याची नियमित तपासणी करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले आहे. मात्र, मालदीव सरकारच्या आदेशानुसार अहमद अदीब यांना मालदीवला परतणे बंधनकारक आहे. त्यामुळे ते आता मालदीवला परतणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maldives vice president Ahmed Adeeb is admitted in Pune