लोकसहभागातून समाजविकासासाठी ‘सकाळ’ कटिबद्ध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

लोकसहभागातून साडेसातशे गावांना दुष्काळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न, हजारो शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन एका अर्थाने या गावांच्या विकासाला लावलेला हातभार, अशी अनेक चांगली कामे ‘सकाळ’ करीत आहे. केवळ टीका न करता जातपात, धर्म, राजकीय पक्ष बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन समाजाच्या विकासासाठी ‘सकाळ’ कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले.

पुणे - लोकसहभागातून साडेसातशे गावांना दुष्काळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न, हजारो शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन एका अर्थाने या गावांच्या विकासाला लावलेला हातभार, अशी अनेक चांगली कामे ‘सकाळ’ करीत आहे. केवळ टीका न करता जातपात, धर्म, राजकीय पक्ष बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन समाजाच्या विकासासाठी ‘सकाळ’ कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले.

सकाळ रिलीफ फंडाने दिलेल्या सव्वा कोटी रुपयांच्या मदतीतून माळीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाने ‘माळीण वसतिगृहा’ची घोडेगाव येथे इमारत उभारली आहे. याचे उद््घाटन प्रतापराव पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. तसेच, ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार, ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र पिसाळ, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, ‘एमटीडीसी’चे कार्यकारी संचालक अभिमन्यू काळे, सकाळ रिलीफ फंडाच्या कार्यकारी समितीचे सदस्य डॉ. सतीश देसाई, पोपटलाल ओसवाल, वालचंद संचेती, शैलेश गुजर, राजेश शहा, आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष अजित काळे, उपाध्यक्ष व वसतिगृह समितीचे अध्यक्ष तुकाराम काळे, कार्याध्यक्ष सुरेश काळे, सचिव मुकुंद काळे, खजिनदार शिवाजीराव घोडेकर, माळीणच्या सरपंच हौसाबाई असवले, घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे आदी या वेळी उपस्थित होते.

प्रतापराव पवार म्हणाले, ‘‘वसतिगृहाची इमारत उभी करण्यात ‘सकाळ रिलीफ फंडा’सोबत समाजाचे मोठे योगदान आहे. समाजाचा ‘सकाळ’वर असलेला विश्वास आणि कोणतीही गोष्ट करण्यासाठी आमचे विश्वस्त वेळ देतात, झटतात या एकोप्यातून चांगल्या गोष्टी घडतात. ‘सकाळ’चे संस्थापक नानासाहेब परुळेकर यांच्यापासून ही मदतीची परंपरा सुरू आहे.

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या माध्यमातून मुलांना परदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी मदत करतो. यात समाजाचे साहाय्य आहे. आदिवासी विद्यार्थांच्या वसतिगृहासाठी एक चांगली इमारत बांधली, दिलेल्या पैशाचा चांगला विनियोग झाला, याचे समाधान आहे.’’

वळसे पाटील म्हणाले, ‘‘माळीणमध्ये मदत करण्यासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे पैसा जमा झाला होता. या भागातील विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय नव्हती; म्हणून वसतिगृह बांधण्याचा प्रस्ताव समोर आला. ‘सकाळ’ने त्यास मान्यता देऊन पैसे देत पुढाकार घेतला. राज्यात, देशात कोणतीही आपत्ती किंवा संकट आले, की ‘सकाळ माध्यम समूह’ मदतीसाठी धावून येतो.’’
श्रीराम पवार म्हणाले, ‘‘वसतिगृहाचा हा उद््घाटन सोहळा समाधान व साफल्याचा क्षण आहे. ‘सकाळ’वर विश्वास असल्याने मोठ्यांसह लहान मुलेही त्यांच्याकडील पैसे देऊन समाजकार्याला हातभार लावतात.’’

या वेळी संस्थेचे अध्यक्ष अजित काळे, उपाध्यक्ष तुकाराम काळे, सत्यशील शेरकर, माजी विद्यार्थी गणेश उरसाळे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक जयसिंगराव काळे यांनी प्रास्ताविक केले. मुकुंद काळे यांनी आभार मानले.

सुविधांनी सुसज्ज इमारत
या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना राहण्यासाठी नऊ खोल्या आहेत. अपंग विद्यार्थ्यांसाठीही सर्व सुविधा असलेली खोली, स्वतंत्र भोजनकक्ष व स्वयंपाकघर, अभ्यासिका, स्वच्छतागृह, कार्यालय अशी व्यवस्था आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malin Hostel Building making by Sakal relief Fund Prataprao Pawar