#Malin माळीण होण्याचा धोका...

Malin
Malin

माळीण (ता. आंबेगाव) येथे ३१ जुलै २०१४ रोजी घडलेल्या घटनेला आता ४ वर्षे होतील. या घटनेत गावाचा ७० टक्के भाग भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली गेला. १५१ जणांचा मृत्यू झाला. १०० लोक बेपत्ता झाले. गावातील ४० घरे बाधित झाली. या दुर्घटनेनंतर केलेल्या पाहणीत पुणे जिल्ह्यामध्ये २३ गावे धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले. सरकारच्या म्हणण्यानुसार, यापैकी १६ गावांमध्ये उपाययोजनांची कामे सुरू झाली आहेत; परंतु गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार यातील एकाही गावात ठोस कामे झालेली दिसून येत नाहीत. सरकारचे ‘नियोजनात आघाडी; पण अंमलबजावणीत पिछाडी’ हे बोधवाक्‍य असावे, अशा पद्धतीनेच कारभार सुरू आहे आणि गावकऱ्यांवर मात्र रात्रंदिन मृत्यूची छाया आहे. या गावांसाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

भोर - समन्वयाअभावी कामे रखडली
दरड कोसळणाऱ्या तालुक्‍यातील संभाव्य चार गावांमध्ये सरंक्षणात्मक उपाययोजना करण्यासाठीच्या कामास अद्याप सुरवात झाली नसल्यामुळे यावर्षीही पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. यामध्ये भोर तालुक्‍यातील हिर्डोशी खोऱ्यातील कोर्ले-जांभूळवाडी, धानवली, भाटघर धरण खोऱ्यातील पांगारी-सोनारवाडी व हेडेन या गावांचा समावेश आहे. प्रशासनाच्या वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागांमधील समन्वय नसल्यामुळे ही कामे सुरू झाली नाहीत.

चार गावांमधील धरण किंवा काही भाग वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने त्यांच्या मान्यतेशिवाय कामे केली जाऊ शकत नाहीत. यामुळे निधी असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाला कामे करता येत नाहीत. माळीण दुर्घटनेनंतर गेल्या वर्षी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. बिराजदार यांच्या टीमने भोरमधील चार गावांसाठी संरक्षणाच्या दृष्टीने करावयाच्या कामांच्या आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना दिला. त्यानुसार ७ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांनी चार गावांच्या सुरक्षिततेच्या कामांसाठी सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीमधून संबंधित गावच्या डोंगरावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी दरड प्रवण क्षेत्रात जंगली गटार काढणे, डोंगर उतारावरील दगड फोडणे, डोंगराच्या चढाला स्थिरता येण्यासाठी आणि डोंगरावरील दगडमाती गावात येऊ नये यासाठी गॅबियन वॉल किंवा क्रॉक्रीट भिंत बांधणे, डोंगर उतारावर झाडे लावणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

मुळशी - घुटके गावाला भूस्खलनाचा धोका
मुळशी धरण भागात कोकणच्या हद्दीवर असलेले घुटके (ता. मुळशी) गाव भूस्खलनाच्या धोक्‍याच्या कक्षेत येते. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरतात. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.  मुळशी धरण भागातील घुटके गाव डोंगराच्या कडेला वसलेले आहे. पायथ्याला गाव वसलेले. अत्यंत दुर्गम असल्याने मोबाईलची रेंजही येत नाही. रेंज काही विशिष्ट ठिकाणी जेमतेम येते. सुमारे पंचवीस घरांचा उंबरठा. या गावात शंभर लोक राहतात. गावठाण शेजारी डोंगराचे पठार व पायथ्याला गाव वसलेले. अत्यंत पावसाचा हा प्रदेश आहे. डोंगरावर होणारा सर्व पाऊस पठारावर साचतो व मुरतो. पठारावर जिरलेले पाणी पायथ्याच्या गावठाणच्या काही ठिकाणांतून जमिनीतून बाहेर उपळते. काही ग्रामस्थांच्या घरांजवळच जमिनीतून पाणी बाहेर येते. त्यामुळे घरांच्या भिंतीला तडा गेलेला आहे. सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी खूप मोठा पाऊस झाला. डोंगराला मोठी भेग पडली. सुमारे अडीचशे फूट लांब व फूटभर रुंद अशी भेग पडली.

त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात भूस्खलनाच्या भीती आहे. दोन-तीन दिवस सलग जोराचा पाऊस झाल्यास ग्रामस्थांमध्ये घबराट होते. सुरक्षित निवाऱ्यासाठी काही वेळा गावातील शाळेचा आधार घेतात. त्या वेळी तत्कालीन प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ, वैज्ञानिक यांनी पाहणी केली. परंतु उपाययोजना काही झाल्या नाहीत.  दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वृत्तपत्रांमध्ये धोका असलेल्या गावांमध्ये घुटके गावाचे नाव येते. ग्रामस्थांमध्ये भीती पसरते. परंतु उपाययोजना काही होत नाही.

खेड - भोमाळे परिसरात डोंगराला भेगा
भोमाळे (ता. खेड) गावावर १९९४ साली दरड कोसळली होती. सुदैवाने कोसळलेली दरड गावावर न येता गावाच्या वरच्या बाजूस असणाऱ्या ओढ्याच्या पात्रातून वाहून गेल्याने गाव सुदैवाने बचावले होते. या घटनेत दोन नागरिकांचा बळी गेला होता. संपूर्ण गाव पावसाळ्यात आजही भीतीच्या सावटाखाली असून, १९९४ सालच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्यास संपूर्ण भोमाळे गाव डोंगराच्या कुशीत सामावले जाईल, अशी परिस्थिती असल्याने गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्टयात निसर्गाच्या कुशीत वसलेले ७० घरांचे व ४०० लोकसंख्येचे हे गाव. गावची भौगोलिक परिस्थिती पाहता गावात प्रवेश होतो तो भीमा नदीचे विस्तीर्ण पात्र, पश्‍चिमेस व दक्षिणेस डोंगरराशी व यामध्ये वसलेले हे गाव. १४ ऑगस्ट १९९४ साली या निसर्गसंपन्न गावावर निसर्गाची अवकृपा झाली. सकाळी नऊला डोंगराच्या दक्षिणेकडील भागात स्फोटासारखा मोठा आवाज झाला. पाहता पाहता डोंगराचा मोठा भाग तुटून गावाच्या दिशेने झेपावला. सकाळच्या वेळेस झालेल्या या घटनेने लोक घरे सोडून बाहेर सैरावैरा पळत सुटली. डोंगराचा हा तुटलेला भाग अगदी गावाच्या जवळ येऊन गावाजवळील ओढ्यात विसावला. गाव थोडक्‍यात बचावले. मात्र, गावच्या वरच्या बाजूस डोंगराकडे निघालेले रामचंद्र वाजे व दत्तात्रेय केंगले हे या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने मृत्युमुखी पडले होते परंतु आजही हे गाव ‘जैसे ते’ आहे.

जुन्नर - तळमाची वाडीचे पुनर्वसन रखडले
जुन्नर तालुक्‍यातील निमगिरी अंतर्गत दौंडया डोंगराच्या उतारावर वसलेल्या तळमाची वाडीचा दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या गावात समावेश आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे दरड कोसळण्याचा धोका नसल्याचा अभिप्राय दिला असल्याने या गावास निधी दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मागील वर्षी १४ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास डोंगर उतारावर गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर भुस्खलन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन दिवसांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी येथे भेट देण्यापलीकडे या घटनेची शासकीय पातळीवरून गांभीर्याने दखल घेतली नाही. अतिवृष्टीचा हा भाग असल्याने भूस्खलनामुळे भीतीच्या सावटाखाली राहावे लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्‍त केली. 

गावापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर १९७८ मध्ये भूस्खलन झाल्याचे ज्येष्ठ ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. २००५ मध्ये येथील जमिनीला लांबवर व खोल भेगा पडल्या होत्या. यानंतर भूगर्भशास्त्रज्ञांनी येथे भेट देऊन पाहणी केली होती. भूजल सर्वेक्षण विभागाकडून पाहणी करण्यात आली होती. त्यांनी देखील भूस्खलन होण्याची शक्‍यता असल्याचे मत व्यक्‍त केले होते. यामुळे या गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय शासनाने घेतला, परंतु गेल्या सहा-सात वर्षांपासून पुनर्वसनाचे काम ठप्प आहे.

मावळ - हालचालीच नाहीत
आंबेगाव तालुक्‍यातील माळीण दुर्घटनेनंतर जाग आलेल्या सरकारने जिल्ह्यातील तेवीस गावे धोकादायक म्हणून जाहीर केली आहेत. उपाययोजना करण्यासाठी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तेवीस गावांपैकी मावळ तालुक्‍यातील गावांमध्ये प्रत्यक्षात कोणत्याच हालचाली सुरू झालेल्या नाहीत. काही ठिकाणी फक्त नोटिसा चिकटवून, तर काही ठिकाणी हद्दीचा प्रश्‍न सांगून यंत्रणा या जबाबदारीतून हात झटकत आहेत. मावळ तालुक्‍यातील भुशी, बोरज, ताजे, गबालेवाडी, मोरमारे वाडी, माऊ, तुंग, मालेवाडी, लोहगड आदी गावे धोकादायक म्हणून सरकारने घोषित केली आहेत. माळीण गावात झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्ह्यामधील धोकादायक गावांचा शोध घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता.

धोकादायक गावांचा सखोल अहवाल तयार करण्याचे काम ‘सीओईपी’ला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ‘सीओईपी’ने जिल्ह्यातील गावांचा सर्व्हे करत काही गावांमध्ये तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासंबंधीचा अहवाल दिला आहे. या गावांमध्ये प्रत्यक्ष भेट देत पाहणी करण्यात आली. मात्र, उपाययोजनांबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ असल्याचेच दिसून आले. पावसाळ्यात या डोंगरावरून दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. घाटमाथ्यावर होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी दरडींच्यामध्ये मुरून, दरडींची झीज होऊन, ठिसूळ होऊन दरडी कोसळण्याची शक्‍यता आहे.

आंबेगाव - रात्री झोप लागेना!
आंबेगाव तालुक्‍यातील आदिवासी अतिसंवेदनशील गावांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. धोकादायक परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढा, या मागणीसाठी गावकरी रोज हेलपाटे मारत आहेत; मात्र गावकऱ्यांच्या या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या गावांचे तातडीने पुनर्वसन झाले नाही, तर आंबेगाव तालुक्‍यात दुसरे माळीण होण्याची भीती नागरिकांना सतावते आहे. बेंढारवाडीच्या पश्‍चिम दिशेला असलेला डोंगराचा कडा कोसळण्याचा धोका असून, येथे १९ कुटुंबे आहेत. ५०० मीटर अंतरावर औदुबेश्‍वर मंदिराजवळ पुनर्वसन करावे. अशी मागणी बाधितांनी केली होती. आंबेगाव तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेने नऊ घरांच्या पुनर्वसनासाठी नऊ लाख रुपये मंजूर केले आहेत. देवस्थानाची जागा असल्याने विरोध झाला आहे. तुम्ही स्वतःच्या जागेत घरे बांधा.

जागेचा प्रश्‍न मिटल्यानंतर बॅंक खात्यात पैसे जमा करू, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. उर्वरित दहा घरांसाठी शबरी घरकुल योजनेतून निधी द्यावा, अशी शिफारस पंचायत समितीने केली आहे. पण जागेचा प्रश्‍न न सुटल्याने पुनर्वसनाचे काम ठप्प आहे.   माळीण दुर्घटनेपासून साडेतीन किलोमीटर अंतरावर माळीण ग्रामपंचायतीच्या हद्दीत पसारवाडी आहे. येथील डोंगर अतिसंवेदनशील आहे. येथे माळीणची पुनर्रावृत्ती होण्याचा धोका आहे. तीस घरे आहेत. जवळच असलेल्या डोंगराच्या माथ्यावर पुनर्वसन करावे. 

समस्या
   घरांच्या पायाला पाणी मुरल्याने धोका
   जमिनीतून पाणी उफळते
   भूस्खलनाचा धोका
   डोंगर व पठाराला भेगा
   डोंगर कडा कोसळण्याच्या स्थितीत
   दगडगोटे धबधब्याच्या मार्गाने गावाकडे येतात
   डोंगराचा मोठा भाग गावावर झेपावलेला 
   डोंगरात जमिनीला भेगा

काय करावे..
   गावांमध्ये वृक्षारोपण करणे
   ड्रेनेज सिस्टीमसह पाणीवहन 
   आवश्‍यक त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधावी 
   जंगली गटार काढणे
   डोंगर उतारावरील दगड फोडणे
   डोंगराच्या चढाला स्थिरता आणणे
   गॅबियन वॉल किंवा क्रॉक्रीट भिंत बांधणे
   पाणी मुरणाऱ्या भागाची पाहणी करून उपाययोजना करावी
   धोका असणाऱ्या घरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे
   तत्काळ हेल्पलाइनची सोय करावी
   दगड कोसळणाऱ्या भागात जाळी लावावी 
   पठारावरच्या पाण्यासाठी उपाययोजना करावी
   सध्या डोंगरावर तातडीच्या उपाययोजना कराव्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com