जामगावात आदिवासींसाठी ‘मॉल’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

जामगाव-दिसली (ता. मुळशी) परिसरातील कातकरी समाजाला आता त्यांच्या इच्छेने मॉलप्रमाणे खरेदी करण्याचा आनंद घेता येणार आहे. क्विक हिल फाउंडेशन, डोनेट एड सोसायटी, टाटा पॉवर व कसबा गणपती ट्रस्टने या अभिनव उपक्रमाची सुरवात जामगाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने दास मॉलच्या माध्यमातून केली आहे.

माले - जामगाव-दिसली (ता. मुळशी) परिसरातील कातकरी समाजाला आता त्यांच्या इच्छेने मॉलप्रमाणे खरेदी करण्याचा आनंद घेता येणार आहे. क्विक हिल फाउंडेशन, डोनेट एड सोसायटी, टाटा पॉवर व कसबा गणपती ट्रस्टने या अभिनव उपक्रमाची सुरवात जामगाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने दास मॉलच्या माध्यमातून केली आहे.

या मॉलचे उद्‌घाटन शनिवारी (ता. १८) क्विक हिल फाउंडेशनच्या संचालिका नेत्रा देशपांडे यांच्या हस्ते झाले. या वेळी फाउंडेशनचे व्यवस्थापक अजय शिर्के, कसबा गणपती ट्रस्टचे अनिल पानसे, सरपंच अलका ढाकूळ, माजी सरपंच हनुमंत सुर्वे, रामचंद्र ठोंबरे, माजी उपसरपंच सोपान डोख, वसंत सुर्वे, शंकर सुर्वे, शंकर ढाकूळ, विलास मालुसरे, एकनाथ बांदल, पोलिस पाटील दत्ता सुर्वे व डोनेट एड सोसायटीचे नितीन घोडके आदी उपस्थित होते. 

आदिवासी कातकरी समाजासाठी झटणाऱ्या क्विक हिल फाउंडेशनने सुमारे ३ वर्षांपूर्वी जामगाव-दिसली येथे हनुमंत सुर्वे यांच्या पुढाकाराने व टाटा पॉवरच्या सहकार्याने आदिवासी समाजाकरिता सुमारे अडीच हजार चौरस फुटाचा बहुउद्देशीय हॉल बांधला होता. यामध्ये प्रामुख्याने लग्न व विविध कार्यक्रम व्हायचे. तसेच, आदिवासी मुलांसाठी शाळा व पोषण आहार दिला जायचा. परंतु, आता या ठिकाणी आदिवासींना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंचा मॉल सुरू करण्यात आला.

या मॉलमध्ये आदिवासींना लागणाऱ्या विविध वस्तू एकाच ठिकाणी मिळणार आहेत. त्यात शाळेची स्टेशनरी, कपडे, फर्निचर, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू अशा अनेक वस्तू आहेत. त्या पुण्यातील दानशूर व्यक्तींनी स्वतःच्या घरातल्या अतिरिक्त; परंतु चांगल्या स्थितीतील असलेल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. कातकरी बांधव या ठिकाणी श्रमदान अथवा नाममात्र शुल्क देऊन त्यांना आवश्‍यक वस्तू घरी घेऊन जाऊ शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mall for Katkari Society