कुपोषणावर मात करण्यासाठी टाटा ट्रस्ट्‌सचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पुणे - समाजातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी टाटा ट्रस्ट्‌सने पुढाकार घेतला असून, यासाठी मार्स इनकॉर्पोरेटेडशी धोरणात्मक भागीदारी केली आहे. या भागीदारीतून शालेय मुलांसाठी ‘गोमो’ दाल क्रंचिज हे चांगली पोषणमूल्ये असणारे उत्पादन सादर करण्यात आले आहे. निवडक भागीदार संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील खेडोपाड्यात ते वितरित करण्यात येणार आहे.

पुणे - समाजातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी टाटा ट्रस्ट्‌सने पुढाकार घेतला असून, यासाठी मार्स इनकॉर्पोरेटेडशी धोरणात्मक भागीदारी केली आहे. या भागीदारीतून शालेय मुलांसाठी ‘गोमो’ दाल क्रंचिज हे चांगली पोषणमूल्ये असणारे उत्पादन सादर करण्यात आले आहे. निवडक भागीदार संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील खेडोपाड्यात ते वितरित करण्यात येणार आहे.

याकामी टाटा ट्रस्ट्‌सचे अध्यक्ष रतन टाटा यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. भारतातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शालेय मुलांना अधिक चांगले पोषणमूल्य असणारा पदार्थ उपलब्ध करून दिला जावा, अशी त्यांची इच्छा होती. यासाठी टाटा ट्रस्ट्‌सने मार्स कंपनीशी सहयोग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच प्रथिनयुक्त पोषक पदार्थ पुरविण्याचा मार्ग निवडण्यात आला आहे. या दोन संस्थांच्या सहकार्यातून सुरू करण्यात आलेल्या या नव्या उपक्रमाचे उद्‌घाटन टाटा ट्रस्ट्‌सचे व्यवस्थापकीय विश्वस्त आर. वेंकटरमणन आणि मार्स इनकॉर्पोरेटेडचे अध्यक्ष स्टीफन बॅजर यांच्या हस्ते आज खेड सिटी येथे झाले. या वेळी दोन्ही संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   

शालेय वयोगटातील मुला-मुलींसाठीचा ‘गोमो’ दाल क्रंचिज हा पदार्थ प्रथिने आणि मायक्रो न्युट्रियंट्‌सयुक्त असणार आहे. ‘मार्स’च्या खेड सिटी येथील प्रकल्पात त्याचे उत्पादन करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पोषणमूल्यांनी परिपूर्ण असा पदार्थ परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिला जाणार आहे. प्रारंभीच्या टप्प्यात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात वितरित करण्यात येणार आहे. काही निवडक संस्था आणि महिला स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून हा पदार्थ ग्रामीण भागात दूरवर पोचविला जाणार आहे, अशी माहिती वेंकटरमणन यांनी दिली.

बॅजर म्हणाले, की संपूर्ण जग मोठ्या प्रमाणावर सामाजिक, पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करीत आहे. यासाठी दूरगामी दृष्टिकोन असणाऱ्या भागीदारीची आवश्‍यकता असते. या पार्श्‍वभूमीवर भारतातील पोषणमूल्यांचा आणि जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी टाटा ट्रस्ट्‌सने घेतलेल्या पुढाकारामुळे आम्ही प्रभावित झालो आहोत. या एका प्रयत्नातून आम्ही जागतिक स्तरावरील आरोग्याचा प्रश्न सोडवू शकणार नाही. मात्र, हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.

काही अपरिहार्य कारणास्तव रतन टाटा हे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला.

‘तनिष्का’ सदस्यांचा सक्रिय सहभाग
कुपोषणाच्या प्रश्‍नी टाटा ट्रस्ट्‌स आणि ‘मार्स’च्या या संयुक्त उपक्रमात ‘सकाळ’च्या ‘तनिष्का’ व्यासपीठाच्या सदस्यांचाही सक्रिय सहभाग राहणार आहे. चांगल्या पोषणमूल्यांच्या आवश्‍यकतेबरोबरच, ‘गोमो’ या उत्पादनाविषयी ‘तनिष्का’च्या सदस्या राज्यभरातील ग्रामीण भागात जनजागृती करणार आहेत. काही इच्छुक महिला त्याच्या वितरणाचेही काम करणार आहेत आणि या कामातून त्यांना काही प्रमाणात अर्थार्जनही होणार आहे, अशी माहिती ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी दिली. याआधी टाटा ट्रस्ट आणि ‘गुगल’ यांच्या ‘इंटरनेट साथी’ या उपक्रमाअंतर्गत ‘तनिष्का’च्या सदस्यांनी सहा महिन्यांत ग्रामीण भागातील ४.७५ लाख महिलांना इंटरनेट साक्षर करण्यात यश मिळविले आहे, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: Malnutrition Tata Trust Initiative