#SaveTree उजाड माळरानावर हिरवीगार पालवी

प्रवीण खुंटे
रविवार, 23 डिसेंबर 2018

पंधरा वर्षांपूर्वी शेतामध्ये पाणी देताना पाटामध्ये सुतळीचा एक टुकडा पडलेला होता. तो उचलल्यावर लक्षात आले की, यातून पाणी खाली झिरपते. त्याचा फायदा आता झाला. यंदा या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात झाडे जगवायची कशी? असा विचार सुरू असतानाच तो प्रसंग आठवला. या उन्हाळ्यात ही झाडे जगवली तर पुढे त्यांना कधीही पाणी घालण्याची गरज पडणार नाही. 

- गणेश म्हेत्रे, वनरक्षक, डोंगरगाव 

पुणे : खराब झालेली प्लॅस्टिकची बाटली, त्यात पाणी आणि सुतळीचा तुकडा, बस्स... याच्या जिवावर तब्बल चार हजार रोपं जगविण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम वनअधिकाऱ्याच्या छोट्याशा पुढाकारामुळे शक्‍य झाला आहे. हवेली तालुक्‍यातील डोंगरगाव वनक्षेत्राचे वनरक्षक गणेश म्हेत्रे यांनी दहा हेक्‍टर जमिनीवरील चार हजार झाडांना "संजीवनी' दिली आहे. 

राज्य सरकारच्या 33 कोटी वृक्षलागवड योजनेच्या माध्यमातून मागील वर्षी डोंगरगावच्या ओसाड रानावर चार हजार रोपे लावली होती. परंतु, दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे रोपे जगवायची कशी हे मोठे आव्हान होते. जिथे माणसाला पुरेसे पाणी मिळत नाही तिथे रोपांना कुठून आणणार? अशा परिस्थितीत म्हेत्रे यांची कल्पना संजीवनी देणारी ठरली. याला वन परिक्षेत्र अधिकारी विष्णू गायकवाड यांचा पाठिंबा आणि वनसेवक बापू बाजारे यांची मदत मिळाली. रखरखते ऊन, खडकाळ जमीन, पाण्याची कमतरता, दुष्काळाची झळ अशा परिस्थितीत ही रोपे जगविण्यासाठी 50 ते 60 टॅंकर पाण्याची गरज होती.

परंतु, या उपक्रमामुळे 12 ते 15 टॅंकर एवढ्या कमी पाण्यातच ही रोपे जगू शकतील. यातून हजारो लिटर पाण्याची बचतही होईल. एका बाटलीतील पाणी किमान तीन दिवस झिरपत असते. त्यामुळे पुढील 15 दिवस जमीन ओली राहात असल्याने पाणी देण्याची गरज पडत नाही.

अशी आहे कल्पना 

एक लिटर पाण्याची खराब झालेली प्लॅस्टिकची बाटली घ्यावी. त्यामध्ये पाणी भरायचे. एक सुतळीचा तुकडा घेऊन त्याची एक बाजू बाटलीत आणि दुसरी रोपाच्या मुळाशी सोडायची. सुतळीमुळे पाणी झिरपत येऊन रोपाच्या मुळाशी पडते. यातून जमीन ओली राहते, रोप जगण्यासाठी आवश्‍यक तेवढे पाणीही मिळते आणि पाण्याची मोठी बचतही होते. 
 
दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे रोपे जगविण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर होते. त्यात या उपक्रमाचा खूपच चांगला फायदा झाला. यातून कोमेजून जाणाऱ्या रोपांना पालवी फुटली आहे. हा उपक्रम पुणे रेंजमध्ये येणाऱ्या सर्व ठिकाणी राबविण्यास आम्ही सुरवात केली आहे. 

- विष्णू गायकवाड, वन परिक्षेत्र अधिकारी, पुणे 

पाण्याबाबत केले जाणारे अनोखे उपक्रम कळवा... 
फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम 

Web Title: On Malran Go green is there pune news