दरड कोसळल्याने माळशेज घाट बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

ओतूर - नगर- कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात सोमवारी (ता. २०) मध्यरात्री दोनच्या सुमारास दरड कोसळली. दरड कोसळताना पाहून टेंपोतील पिता-पुत्रांनी खाली उडी टाकल्याने ते बचावले. यात टेंपोचा चक्काचूर झाला असून, दगडगोटे लागून मुलगा मात्र जखमी झाला. दगड व मातीचा राडारोडा रस्त्यावर आल्याने महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

ओतूर - नगर- कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात सोमवारी (ता. २०) मध्यरात्री दोनच्या सुमारास दरड कोसळली. दरड कोसळताना पाहून टेंपोतील पिता-पुत्रांनी खाली उडी टाकल्याने ते बचावले. यात टेंपोचा चक्काचूर झाला असून, दगडगोटे लागून मुलगा मात्र जखमी झाला. दगड व मातीचा राडारोडा रस्त्यावर आल्याने महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

नगर- कल्याण महामार्गावरील पुणे व ठाणे या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या माळशेज घाटात पावसाळ्यात दरडी कोसळतात. कल्याण बाजूला रस्त्यावर पडणाऱ्या धबधब्यापुढे सोमवारी मध्यरात्री दरड कोसळली. उल्हासनगर येथून गोळ्या-बिस्किटे घेऊन नगरकडे जाणाऱ्या टेंपोचे (एमएच ०४, जीसी २९५९) चालक शहादेव राम दहिफळे (वय ५०) व त्यांचा मुलगा अमोल शहादेव दहिफळे (वय २१, रा. मोहटादेवी, ता. पाथर्डी, जि. नगर) यांनी दरड कोसळत असल्याचे पाहून टेंपोतून खाली उडी टाकली. त्याच वेळी दरड कोसळली. अमोल बोगद्याच्या बाजूला पळाला, तर त्याचे वडील मागे खालच्या बाजूला पळाले. टेंपोचा चक्काचूर झाला असून, दगडगोटे लागून अमोल जखमी झाला. त्यास एका वाहनचालकाने एमटीडीसीजवळ आणून सोडले आणि १०८ रुग्णवाहिकेला कळविले. संदेश मिळाल्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास शासकीय रुग्णवाहिका १०८ मध्ये डॉ. सचिन खेडकर व पायलट गणेश गायकर यांनी जखमी अमोल याच्यावर त्वरित प्रथमोपचार करून आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अमोल याने वडिलांच्या मोबाईलवर संपर्क साधला. वडिलांशी संपर्क साधल्यानंतर सकाळी त्याचे वडील आळेफाटा येथे अमोल उपचार घेत असलेल्या दवाखान्यात आले. दैव बलवत्तर म्हणूनच दहिफळे पिता-पुत्र वाचले.

एसटी वाहतूक खंडाळामार्गे
माळशेज घाटात पावसाचे आणि धुक्‍याचे प्रमाण जास्त असल्याने दरड हटविण्याच्या कामात अडथळे येत आहेत. पावसामुळे काही भागांत छोट्या- मोठ्या दरडी कोसळत आहेत. त्यामुळे माळशेज घाटातून नगर- कल्याण महामार्गावरील वाहतूक पूर्ण बंद ठेवण्यात आली आहे. नगरकडून मुंबईकडे जाणारी एसटी बस वाहतूक आळेफाट्यावरून खंडाळामार्गे वळविण्यात आली आहे. माळशेज घाटातील वाहतूक सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

Web Title: Malsege Ghat was closed due to landslides Collapsed