माळवाडी बसथांबा येथे अतिक्रमणामुळे कोंडी

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

वारजे माळवाडी - आंबेडकर चौक ते गणपती माथा या मुख्य रस्त्याच्या दरम्यान असलेल्या माळवाडी बसथांबा व कालवा रस्ता चौकात आता भर दुपारीदेखील वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. येथे वाहतूक पोलिस उपस्थित नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

माळवाडी बसथांबा हा वारजे माळवाडी येथील मुख्य बसथांबा आहे. या परिसरात दररोज अंदाजे सात ते आठ हजार नागरिक कामानिमित्त आणि प्रवासानिमित्त येत असतात. येथे काही इमारती, दुकानांचे अवैधरीत्या बांधकाम झाले आहे. तसेच भाजी विक्रेते, हातगाड्या व वाहनांचे अतिक्रमण आहे. येथील रस्ता दोन पदरी आहे. 

एका बाजूला पुण्याला जाणाऱ्या तीन आसनी रिक्षाचा थांबा आहे. तर दुसऱ्या बाजूला उत्तमनगर ला जाणाऱ्या सहा आसनी रिक्षांचा थांबा आहे. त्यामुळे रस्ता अजून अरुंद झाला आहे. अतिक्रमणामुळे वाहतुकीसाठी एक पदरी रस्ता शिल्लक आहे. 

कालवा रस्ता चौकाच्या जवळ दोनशे मीटर मागेपुढे अतिक्रमणे आहेत.  यामुळे गणपती माथा, शिवणे उत्तमनगर, कोंढवे धावडे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कोंडीचा त्रास होतो. शाळा सुटण्याच्या वेळेला या चौकात गर्दी वाढत आहे. हा रस्ता माळवाडीत जाणारा एकमेव मुख्य रस्ता आहे. त्यामुळे, कोंडीत भर पडत असते.

रुंदीकरणाचे काम अडकले कोठे ? 
आंबेडकर चौक ते गणपती माथा या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम आठ नऊ वर्षांपासून रखडलेले आहे. या पार्श्वभूमीवर विशेष भूमी संपादन विभागाने महापालिकेला जागेचा ताबा घेण्यासाठी प्रक्रिया सुरू करा, असे वर्षांपूर्वी पत्राद्वारे कळवले आहे. त्यासाठी ५० लाख रुपये पालिकेने दिले आहे. मात्र, तरी  रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे.

माळवाडी बसथांबा चौकात रस्ता अरुंद आहे. तेथे पादचारी मार्ग नाही. चौकात विविध अतिक्रमणे आहेत. अतिक्रमण बाबत पालिकेला पत्र पाठविले आहे. त्यावर पालिकेने हातगाडी व भाजी विक्रेत्यांवर दोन वेळा कारवाई केली आहे. परंतु, अतिक्रमण ‘जैसे थे’ आहेच. आम्ही पालिकेकडे ‘नो पार्किंग’ चे फलक मागितले आहेत. ते फलक गणपती माथा ते हायवे पुलापर्यंत बसविणार आहे. वाहतूक कोंडीच्या वेळीही कारवाई करणार आहोत. 
- विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक, वारजे वाहतूक विभाग

हा रस्ता दोन पदरी असून बस रस्त्याच्या मधोमध थांबतात. मागील वाहनांना बसला ओव्हरटेक करून पुढे जाता येत नाही. काही वेळा  बस थांबल्यावर दुचाकी सुद्धा पुढे जाऊ शकत नाही, अशी अवस्था असते. पालिकेने येथे रस्ता रुंदीकरण करावे. बसचे प्रवासी रस्त्यावर येऊन थांबतात. 
- सुधीर धावडे, नागरिक, कोंढवे धावडे

या चौकात नियमित वाहतूक पोलिस नसतात. सकाळी साडेआठ ते दुपारी दीडपर्यंत व दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत वाहतूक पोलिस पाहिजे. 
- संजय दांगट, नागरिक,  शिवणे 

Web Title: Malwadi Busstop Encroachment