#PuneIssues नोंदणी कार्यालयांमध्ये नागरिकच "दुय्यम'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

पुणे - अपुऱ्या जागेत असणारे कार्यालय... छताला पंखा नाही... लोकांची गर्दी झाली की बसायला जागा नाही.... स्वच्छतागृहही नाही... बाहेर खासगी गाड्यांची गर्दी... ही परिस्थिती आहे शुक्रवार पेठेतील मामलेदार कचेरी परिसरातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2 हवेली कार्यालयाची.

पुणे - अपुऱ्या जागेत असणारे कार्यालय... छताला पंखा नाही... लोकांची गर्दी झाली की बसायला जागा नाही.... स्वच्छतागृहही नाही... बाहेर खासगी गाड्यांची गर्दी... ही परिस्थिती आहे शुक्रवार पेठेतील मामलेदार कचेरी परिसरातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2 हवेली कार्यालयाची.

राज्याच्या महसुलात सर्वाधिक वाटा असणाऱ्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयांत राज्यात आणि शहरात थोड्याफार प्रमाणात अशीच स्थिती असल्याचे "सकाळ'च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत आढळून आले.

नागरिकांना मिळणारी "दुय्यम' वागणूक, एजंटांचे वर्चस्व आणि असुविधांचे आगार, अशी स्थिती या कार्यालयांमध्ये...

'मी खरेदीखताचा कागद मिळण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. सूचीसाठीदेखील या महिन्यात अर्ज केला. परंतु वेळोवेळी चकरा मारूनही माहिती देत नाहीत. यावर लेखी उत्तर देण्याची मागणी केल्यास टाळाटाळ केली जाते. सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही मला कागदपत्रे मिळत नाहीत. मात्र, एजंटामार्फत गेल्यास ती लगेच मिळतात. स्वतः कागदपत्रे पाहण्याची मागणी केली असता, फाइलमधील नेमका मला हवा असणारा कागद काढून फाइल पाहण्यास दिली,'' ही सचिन धुमाळ यांची प्रतिक्रिया याबाबत पुरेशी बोलकी आहे.
घनश्‍याम अग्रवाल म्हणाले, 'कागदपत्रांसाठी केलेल्या अर्जाची दखल घेतली गेली नाही. माहिती अधिकारात माहिती मागितली, तर ती देण्यास विलंब लावल्याने प्रथम अपील करावे लागले. त्यामध्ये आठ दिवसांत कागदपत्रे देण्यास सांगण्यात आले होते. मात्र, खूप पाठपुरावा केल्यानंतर ती आता देत आहेत. माझ्यानंतर अर्ज करणाऱ्या एका व्यक्तीला एजंटामार्फत कागदपत्रे लगेच देण्यात आली. या ठिकाणी एका कागदपत्रास पाच हजार रुपयांची मागणी केली जाते.''

या कार्यालयात येणाऱ्यापैकी बहुतांश लोकांच्या प्रतिक्रिया नकारात्मक होत्या. या कार्यालयात कागदपत्रे ठेवण्याची व्यवस्थाही योग्य नाही. येथील भिंती आणि कोपरे रंगलेले आहेत, कागदपत्रे व फाईलवर धूळच धूळ दिसते. सर्व गाड्या रस्त्यावरच पार्क केल्याने मामलेदार कचेरीत येणाऱ्या नागरिकांना त्रास होतो.

मी दोन तारखेलाच रुजू झालो असून, कागदपत्रे व्यवस्थित लावण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेला थोडा वेळ लागेल. 2002 च्या आधीच्या कागदपत्रांबाबत हा प्रश्‍न निर्माण होतो.
- जी. एस. कोळेकर, सह जिल्हा निबंधक

कागदपत्रे वेळेत न मिळण्याची विविध कारणे आहेत. त्यात, जुनी कागदपत्रे खराब झालेली आहेत. काही गहाळ झाली आहेत. आमचा आणि एजंटचा काही संबंध नाही. सर्व कामे नियमाप्रमाणे केली जातात.
- प्रकाश खटावकर, सह दुय्यम निबंधक वर्ग-2, हवेली.

गेट बंद केल्याने अडचणी
मामलेदार कचेरी येथे दुय्यम निबंधक कार्यालयाचा पूर्वीचा रस्ता बंद केल्याने ये-जा करण्यास त्रास होत असल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिकांनी केली. याबाबत आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक हुतात्मा स्मारकाचे कायदेशीर सल्लागार सुनील जाधव म्हणाले, 'येथे गेट बांधण्याची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसील कार्यालयाकडून घेतली आहे. त्यामुळे नागरिकांना अडथळा होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. येथील ऐतिहासिक झाडाचे संवर्धन आम्ही करत आहोत.''

तुमचे अनुभव काय आहेत. लिहा प्रतिक्रिया : ई मेला करा : webeditor@esakal.com वर
ट्‌विट : #PuneIssues

Web Title: mamledar office registration agent public pune issues