मैं अंदर हूँ... मैं अंदर हूँ... ; जगण्यासाठीच्या धडपडीचे कानी आले शेवटचे शब्द..!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

जगण्यासाठी धडपडणारा तो आवाज पुढची पाच-सात मिनिटे येत होता. त्यानंतर मात्र तो बंद झाला. जीवरक्षक काची त्याच्यापर्यंत पोचले, त्या वेळी बराच उशीर झाला होता. जगण्यासाठी धडपडणाऱ्याने आपला प्राण सोडला होता.

पुणे : शनिवारी पहाटे ट्रक नदीत कोसळून झालेल्या अपघातामधील चालक, क्‍लीनरलाही शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं, की आपल्याला वाचवायला कोणीतरी येईल आणि खरंच अपघातानंतर अवघ्या 15 मिनिटांत अग्निशामक दलाचे जवान व जीवरक्षक घटनास्थळी पोचले. ट्रकच्या दरवाजापर्यंत पोचले. त्याचवेळी ट्रकच्या केबिनमधून "मै अंदर हूँ, मैं अंदर हूँ' हे शब्द बचाव पथकाच्या कानी पडले. एकीकडे त्या दोघांची जगण्यासाठी, तर दुसरीकडे त्यांना वाचविण्यासाठी धडपडीने वेग घेतला. पण पाच-सात मिनिटांनंतर तो आवाज क्षीण होत गेला, थांबला... तो कायमचाच ! 

पहाटेच्या अंधारात एक ट्रक पुलावरील कठडा तोडून नदीमध्ये कोसळला. त्यानंतर ट्रक नदीतील पाणी व गाळामध्ये हळूहळू रुतू लागला होता. तुटलेल्या केबिनमध्ये पाणी शिरत होते. त्याचवेळी केबिनमधील एकाची जगण्यासाठीची धडपड सुरू होती. आपल्याला कोणीतरी वाचवेल, अशी आशा त्याला होती. दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी पहाटे साडेचारला जीवरक्षक राजेश काची यांना झोपेतून उठवले. त्यानंतर काची हे पोलिस, अग्निशामक दलाचे जवान व पोलिस मित्रांसमवेत घटनास्थळी पोचले. 

शिडीच्या साह्याने जवान, काची व पोलिस नदीत उतरले. ट्रकमध्ये किती व्यक्ती आहेत, त्या जिवंत आहेत की नाही, याची पाहणी करण्यासाठी काची आतमध्ये पोचले. त्याचवेळी केबिनमध्ये शिरलेल्या गाळयुक्त पाण्यातून "मैं अंदर हूँ... मैं अंदर हूँ...' असे शब्द त्यांच्या कानी पडले. त्यानंतर आवाज देणाऱ्यास वाचविण्यासाठी सर्वांनीच जोरदार प्रयत्न सुरू केले. सगळ्यांची धडपड सुरू झाली.

जगण्यासाठी धडपडणारा तो आवाज पुढची पाच-सात मिनिटे येत होता. त्यानंतर मात्र तो बंद झाला. जीवरक्षक काची त्याच्यापर्यंत पोचले, त्या वेळी बराच उशीर झाला होता. जगण्यासाठी धडपडणाऱ्याने आपला प्राण सोडला होता. काची यांनी साडेआठला एकाचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर जीवरक्षक जगन तिकोणे यांनी केबिन व गाळात अडकलेला दुसरा मृतदेह बाहेर आणला. त्यांना संजय जाधव, इस्माईल शेख यांनी मदत केली. 
 

Web Title: A man Trying to life save