हॉर्न न वाजवणारा माणूस; तुम्ही कधी पाहिलाय?

पांडुरंग सरोदे
रविवार, 19 जुलै 2020

आपण लोकांना हॉर्न न वाजविण्याबाबत सांगत असु तर मग आपण तरी का हॉर्न वाजवावा, आपल्याला खरच इतके घाइचे काम असते का? असा विचार पाठक यांनी केला.

पुणे : तुम्ही वाहतूक कोंडीत अडकला असाल किंवा एखादा दुचाकीस्वार तुम्हाला अचानक "ओव्हरटेक" करुन पुढे निघून गेला, तर तुम्ही काय कराल, बरोबर तुम्ही जोरजोरात हॉर्न वाजवून तुमचा राग व्यक्त करणार. पण, तुम्ही कधी असा माणूस बघितलाय, ज्याने वर्षभरात शहरातील रस्त्यावर 20 हजार 500 किलोमीटर कारद्वारे प्रवास केला, पण एकदाही हॉर्न वाजविला नाही. हो असा माणूस पुण्यात आहे, देवेंद्र पाठक असे त्यांचे नाव. 

पुण्याच्या इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

पुणे शहर जसे सगळ्याच बाबतीत पुढे आहे, तसेच ते वाहतुकीचे नियम मोडण्यातही कायम पुढे असते. त्यातही जर, रस्त्यावर वाहतूक कोंडी असेल, एखादी बस किंवा मोठे वाहन बंद पडले असेल तर, आपण कितीही सुसंस्कृत, संस्कारक्षम असलो तरीही आपले बोट गाडीच्या हॉर्नकडे जातेच आणि मग आपणही इतरांप्रमाणेच कारण नसताना उगीचच हॉर्न वाजवत बसतो. पण पाठक यांची स्टोरी जरा वेगळी आहे. 

देवेंद्र पाठक हे मागील तीन ते चार वर्षांपासून पुण्यात "लाईफ सेविंग फाउंडेशन"चया माध्यमातून अपघातग्रस्त जखमी लोकांना "गोल्डन अवर्स" मध्ये तत्काळ रुग्णालयांत पोचविण्याचे काम करतात. त्याचबरोबर अपघात घडू नयेत, सुरक्षित वाहतूक व्हावी यासाठी देखील त्यांच्या या कामात शहरातील विविध क्षेत्रात काम करणारे तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी आहेत.

आणखी वाचा - पुण्याची सध्याची स्थिती काय? आणि पुणेकरांचं काय चाललंय? 

शहरातील ध्वनी प्रदूषण कमी व्हावे, यासाठी देखील दर रविवारी चौका-चौकात उभे राहून, "नो हॉर्न प्लीज" सारखे फलक हातात घेऊन नागरीकांना गरजेशिवाय हॉर्न न वाजविण्याचे आवाहन करतात. आपण लोकांना हॉर्न न वाजविण्याबाबत सांगत असू तर मग आपण तरी का हॉर्न वाजवावा, आपल्याला खरच इतके घाइचे काम असते का? असा विचार पाठक यांनी केला. त्यानुसार, त्यांनी मागील वर्षी 11 जुलै 2019 पासून कार चालविताना कुठल्याही कारणासाठी हॉर्न न वाजविण्याचा निश्चय केला. त्यास यावर्षी 11 जुलै 2020 या दिवशी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानुसार मागील वर्षभरापासून पाठक यांनी शहरात त्यांच्या कारने शहरात 20 हजार 500 किलोमीटरचा प्रवास केला. त्याप्रमाणे त्यांनी वाहन चालविताना एकदाही हॉर्न वाजविला नाही आणि हो, त्यामुळे त्यांचे कधीच काही नडले ही नाही.

Safety Tip: When is OK to Honk the Horn | USA Fleet Solutions

हॉर्न वाजविला नाही तर नेमके काय फायदे होतात, याविषयी पाठक सांगतात, हॉर्न न वाजविल्याने सगळ्यात मोठा फायदा हा तुमचे डोके शांत राहते. चिडचिडेपणा कमी होतो. आपल्या कर्णकर्कश हॉर्न वाजविल्याचा वृद्ध, नवजात बालके, लहान मुले व पशु पक्षाना त्रास होत नाही. शहरातील ध्वनी प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संरक्षणालाही आपला हातभार लॉगतो. हॉर्न न वाजविल्याने कोणतेही मोठे नुकसान होत नाही.त्यामुळे नागरीकांनी देखील गरज नसल्यास हॉर्न वाजविणे टाळण्याचा प्रयत्न करावा.आता त्यांचे पुढचे लक्ष्य आहे, 50 हजार किलोमीटर प्रवासात एकदाही हॉर्न न वाजविण्याचे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man who does not use horn while driving