मंचरच्या पोलिसांमुळे वाळूमाफिया व अवैध व्यावसायिकांची दाणादाण 

डी. के. वळसे पाटील
Tuesday, 5 January 2021

पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी मंचर पोलिस ठाण्याचा पदभार हाती घेतल्यापासून गेल्या २० दिवसांत बेकायदेशीर वाळूउपसा व अवैध धंदे यांच्या

मंचर : पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी मंचर पोलिस ठाण्याचा पदभार हाती घेतल्यापासून गेल्या २० दिवसांत बेकायदेशीर वाळूउपसा व अवैध धंदे यांच्या विरोधात दिवसा व रात्रीही धडक कारवाई सत्र सुरु झाले आहे. त्यामुळे अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी वाळूउपसा करण्यासाठी वापरली जाणारी यंत्र सामुग्री विकण्यास सुरुवात केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांची बदली पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात झाली. रिक्त झालेल्या जागेवर (ता. १५ डिसेंबर रोजी) सुधाकर कोरे यांची प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी गेली १७ वर्ष मुंबई पोलिस दलात अंधेरी, वीलेपार्ले, सांता क्रुझ आदी पोलिस ठाण्यात कोरे यांनी काम केले आहे. गेल्या २० दिवसात त्यांनी श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथे घोड नदीतून होणारा वाळूउपसा व मंचर येथील ट्रकमधून होणारी वाळू वाहतूक असे दोन छापे टाकून सात ब्रास वाळू, पाच वाहने असा एकूण ३९ लाख ९३ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. तीन जणांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई केली आहे.स्वतः ते व फिरत्या पोलीस पथकाद्वारे गस्त घालत असून वाळू वाहतूक करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे. त्यामुळे वाळू माफियांच्या इराद्यांवर पाणी फिरले आहे. वाळू उपश्यासाठी वापरले जाणारे पोकलेन,जेसीबी, ट्रॅक्टर ट्रॉली व टिप्पर विकण्यास सुरुवात केली आहे. 

जुन्नरच्या आजींची कमाल! वयाच्या ७२ वर्षी 2 दिवसात 2 किल्ले केले सर 

हॉटेल आप्पाची खानावळ (पारगाव शिंगवे), हॉटेल कोहिनूर (पारगाव शिंगवे), हॉटेल शिव मल्हार (पारगाव जारकरवाडी फाटा), हॉटेल किनारा (निरगुडसर), हॉटेल जय मल्हार (धामणी), हॉटेल एकांत व्हॅली (अवसरी बुद्रुक), हॉटेल रुद्र गौरी (नागपूर), , हॉटेल प्रीसा (चांडोली खुर्द), हॉटेल न्यू गणराज (खडकी), हॉटेल शिवांश (लोणी), हॉटेल संग्राम (लोणी), वडगाव काशिंबेग, पिंपळगाव, अवसरी बुद्रुक, सुतारवाडी आदी ठिकाणी छापे टाकून बेकायदा दारू व ताडी विक्री करणाऱ्या २० जणांच्या विरुद्द गुन्हे दाखल केले आहेत. दारू वाहतुकीसाठी वापरली जाणारी दोन वाहने ही जप्त केली आहेत. सात लाख आठ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंभाते यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूमाफिया व अवैध व्यावसायिकांना धडा शिकविला जाईल. वाळू माफियांमुळे गुंडगिरी व भांडणाचे प्रकार वाढतात. मंचर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी पोलिस दलामार्फतआवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. -सुधाकर कोरे, पोलिस निरीक्षक मंचर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manchar police take action against illegal sand mining and illegal trades