मंगेश तेंडुलकरांचे आत्मचरित्र जीवनाचा अर्थ उलगडते

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

पुणे - मिश्‍कील नजरेतले समीक्षक, विज्ञाननिष्ठ आणि आयुष्यभर स्वतःला कलेतून तपासणारे धाडसी व्यक्तिमत्त्व असेच वर्णन मंगेश तेंडुलकर यांचे करता येईल. त्यांचे आत्मचरित्र जीवनाचा अर्थ उलगडून सांगते, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.   

दिवंगत व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या ‘रंगरेषा व्यंगरेषा’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. तेंडुलकर यांच्या पत्नी स्नेहलता तेंडुलकर, अभिनेते राहुल सोलापूरकर, व्यंग्यचित्रकार चारुहास पंडित, अनिल कुलकर्णी उपस्थित होते. अनुबंध प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या आत्मचरित्राचे शब्दांकन स्वाती प्रभुमिराशी यांनी केले आहे. 

देशमुख म्हणाले, ‘‘संवादाच्या ओढीतून आत्मचरित्र साकारते. जगण्याची प्रेरणाही एखाद्या व्यक्तीच्या आत्मचरित्रातून मिळते. असेच व्यक्तिमत्त्व तेंडुलकर यांचे होते.’’ सोलापूरकर म्हणाले, ‘‘तेंडुलकर यांनी व्यंग्यचित्रांतून खिल्ली उडविली तरीही त्यातून कोणावरही ओरखडा काढला नाही. एखाद्या व्यक्तिमत्त्वाच्या मनाचा तळ स्वच्छ दिसावा असे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्यांच्या जीवनातील स्थित्यंतरे आत्मचरित्रात वर्णिलेली आहेत.’’ पंडित म्हणाले, ‘‘तेंडुलकर सरळ, साधे; मात्र मनात काहीही न ठेवता स्पष्टपणे व्यक्त होणारे होते. त्यांचे आत्मचरित्र वाचताना जणूकाही ते आपल्याशी बोलत आहेत असाच भास होतो.’’

Web Title: Mangesh Tendulkar autobiography