रस्त्यालगत फुले फेकली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

मंचर - झेंडू फुलांचे बाजारभाव ऐन श्रावणात कोसळल्याने फूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फुले रविवारी (ता. १९) मंचर ते राजगुरुनगर व आळेफाटा ते ओतूर या रस्त्यालगत फेकून आपला संताप व्यक्त केला. गाडीभाडेही भागत नसल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांचे वार्षिक गणित कोलमडणार आहे.

मंचर - झेंडू फुलांचे बाजारभाव ऐन श्रावणात कोसळल्याने फूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फुले रविवारी (ता. १९) मंचर ते राजगुरुनगर व आळेफाटा ते ओतूर या रस्त्यालगत फेकून आपला संताप व्यक्त केला. गाडीभाडेही भागत नसल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांचे वार्षिक गणित कोलमडणार आहे.

श्रावणापासून गणपती, नवरात्रोत्सव या कालावधीत फुलांना चांगला बाजारभाव मिळतो. या अपेक्षेने आंबेगाव व जुन्नर तालुक्‍यातील  अनेक गावांत शेतकऱ्यांनी फूल शेती केली आहे. येथील हवामान, हलक्‍या प्रतीची पोषक जमीन, जेमतेम पाणी या कारणांमुळे येथील शेवंती व झेंडूच्या विविध जातीची फुले पुणे, मुंबई, कल्याण बाजारपेठेत शेतकरी विक्रीसाठी पाठवतात. फुलांचे उत्पादन तीन ते चार महिने सुरू राहते. कांदा, भाजीपाला व तरकारी मालाला व्यवस्थित बाजारभाव मिळत नसल्याने तोडणीसाठी सुलभ असलेल्या फूल शेतीकडे अनेक शेतकरी वळले आहेत. आळेफाटा येथे फुलांचा बाजार भरतो. डेक्कनमोहा (जि. बीड) येथील शेतकरी मच्छिंद्र आचुरबा काळे यांनी दोन टन कलकत्ता जातीची झेंडूची फुले विक्रीसाठी रविवारी आळेफाटा येथे आणली होती. प्रतिकिलो दोन रुपये बाजारभावही न मिळाल्याने व व्यापाऱ्यांनी खरेदीस असमर्थता दर्शवल्याने काळे यांनी आळेफाटाहून ओतूरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत झेंडूची फुले फेकून दिली. आंबेगाव तालुक्‍यातील काही शेतकरी फुले विक्रीसाठी टेम्पोतून पुण्याला निघाले होते. त्यांनाही निरोप आला. फुले आणू नका. त्यांनी खेड घाटानजीक फुले फेकून दिली. 

टेम्पोला सहा हजार रुपये भाडे द्यावे लागले. मजुरीचा खर्चही वाया गेला. आळेफाट्याला खरेदीदार नसल्याने कल्याणला टेम्पो नेण्याचा विचार होता. पण, तेथील व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. पण त्यांनीही फुले खरेदीस नकार दिला. त्यामुळे रस्त्याच्या कडेला फुले फेकून देण्याचा दुर्दैवी प्रसंग माझ्यावर ओढवला आहे.
-मच्छिंद्र काळे, शेतकरी

Web Title: Mango flowers thrown by the street in manchar