पोलिसांकडून तपासाची फाइल बंद

Manja
Manja

पुणे - सुवर्णा मुजुमदार यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला ‘तो’ मांजा नेमका कोणी वापरला, तो कोणत्या विक्रेत्याकडून आणला होता, या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यास आणि या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना अपयश आले. त्यामुळे तपासाची फाइल आता बंद झाली आहे. जीवघेण्या मांजाचा वापर व विक्री करणाऱ्यांवर पोलिस व महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे आणखी किती जणांचा बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

चिनी व नायलॉन मांजामुळे मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘सकाळ’मधील जाहिरात विभागातील कर्मचारी सुवर्णा मुजुमदार यांचा मृत्यू झाला. एक वर्ष उलटले, तरीही तो मांजा नेमका कोणी वापरला आणि त्याचा विक्रेता शोधण्यात पोलिसांना अपयश आले.

‘कोणाचा पतंग, कोणाचा मांजा हे शोधायचे तरी कसे, ’ असा प्रश्‍न पोलिसांना अजून सुटलेला नाही. 

मुजुमदार यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी काही विक्रेत्यांवर कारवाई केली. पण, कोणालाही अटक झाली नाही. तर वाकड पोलिसांनी काही दुकानांवर छापे घालून दुकानदारांना अटक केली. त्यानंतर पोलिसांची कारवाई थंडावली. महापालिकेनेही आतापर्यंत विक्रेत्यांवर मोठी कारवाई केल्याची सद्यःस्थिती नाही. 

आज प्रथम स्मृतिदिनी तुझ्या आठवणींनी मन सुन्न झाले आहे. सुवर्णा म्हणजे आमची मोठी बहीण. आमच्यावरील तिची माया निस्वार्थी, निर्मळ होती. सर्वांशी मिळून मिसळून राहणारी, सदैव हसणारी व सगळ्यांना मदत करण्यासाठी पुढे येणारी आमची मोठी बहीण नव्हे, आईच तू. वुई आर मिस यू ताई - तुझे सर्व लाडके - अपर्णा आशिष बापट (बहीण),  मनोहर मुजुमदार (वडील), आभा व अक्षय (भाचे) 

पोलिस प्रशासनाने बंदी असणाऱ्या मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. पतंग उडविणाऱ्या मुलांना व त्यांच्या पालकांना पोलिस ठाण्यांच्या पातळीवर त्यांना सूचना दिल्या आहेत. 
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त, पुणे

सुवर्णा मुजुमदार मृत्यू प्रकरणात पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने शोध घेतला. सर्वंकष तपास केला आहे. मात्र, आतापर्यंत काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास तूर्त थांबविला आहे. 
- अप्पासाहेब वाघमळे, पोलिस निरीक्षक

घडलेल्या दुर्घटना... 
     ७ फेब्रुवारी २०१८ -  सुवर्णा मुजुमदार यांचा शिवाजी पुलावरून दुचाकीवरून जाताना चिनी मांजाने गळा कापून मृत्यू. 
     ७ ऑक्‍टोबर २०१८ - नाशिक फाटा येथील जेआरडी उड्डाण पुलावरून जाताना कृपाली निकम यांचाही मांजामुळे मृत्यू. 
     १ डिसेंबर २०१८ - ॲड. महेश गोगावले दुचाकीवरून वडगाव शेरी परिसरात जाताना मांजामुळे जखमी. 
     १५ जानेवारी २०१९ - प्रिया शेंडे या दुचाकीवरून डीपी रस्त्याने जाताना 
मांजामुळे जखमी.

सुवर्णा मुजुमदार यांच्या कुटुंबीयांनी लिहिलेले पत्र  
७ फेब्रुवारी २०१८ ची सायंकाळ. अतिशय हसतमुख, उत्साही माझी मोठी बहीण निशू (सुवर्णा मुजुमदार) हिचे आयुष्य एका पतंगाच्या मांजाने कापले. चार दिवस ती मृत्यूशी लढत होती, शेवटी नियतीपुढे थकली आणि ती ११ फेब्रुवारी २०१८ रोजी ती आम्हाला सोडून गेली. तिच्या जाण्याने आमच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. आई गेल्यावर जणू तीच आमची आई झाली होती. आज एक वर्ष पूर्ण झाले, तरीही एकही दिवस तिच्या आठवणींशिवाय जात नाही. पतंग उडविणाऱ्या मुलांना व त्यांच्या पालकांना आम्हा दोघी बहिणींची नम्र विनंती आहे, की असा प्रसंग दुश्‍मनावरही येऊ नये, अशी काळजी तुम्ही नक्की घ्या ! 
- दर्शना किरण परदेशी (बहीण), दुर्गेश व देवकी (भाचे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com