मांजरीतील साडेसतरानळीचा पाणीप्रश्न गंभीर

कृष्णकांत कोबल
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

साडेसतरानळीच्या पाणी प्रश्नासाठी पालिकेला वारंवार कळवूनही सुरळीत व पुरेसा होत नसल्याने येथील नागरिकांकडून शनिवारी (ता. 20) हडपसर क्षेत्रीय कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. 

मांजरी : साडेसतरानळी ग्रामपंचायतीचा पालिकेत समावेश होऊन अकरा महिने उलटले. तरीदेखील येथील नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल अजूनही 'जैसे थे'च आहेत. पाण्यासाठी वणवण फिरणे, टँकरने पाणी विकत घेणे किंवा थेट जुन्या पालिका हद्दीत जाऊन पाणी मिळविण्याचा प्रयत्न करणे, अशी कसरत आजही त्यांना करावी लागत आहे. त्यामुळे आगीतून फुफाट्यात पडल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 

गाव पालिकेत गेल्यानंतर साडेसतरानळी येथील नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त केला होता. आता येथील रस्ते, ड्रेनेज, पाणी व इतर अनेक प्रश्र्न मार्गी लागणार, असा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. मात्र, येथील परिस्थिती लक्षात घेता पालिका प्रशासानाकडून त्याबाबत घोर निराशा झाली असल्याचे चित्र या परिसरात पाहवयास मिळत आहे. 

या भागात सलग चार-चार दिवस पाणी येत नाही. ढिसाळ वितरण व्यवस्थेमुळे पाणी सोडले जाते त्या दिवशीही पुरेसे पाणी मिळत नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पाण्याबाबत खोटी अश्र्वासने देवून वेळकाढूपणा केला जात आहे. ग्रामपंचायतमध्ये असताना जेवढा त्रास सहन करावा लागला नाही, तेवढा आता सहन करावा लागत आहे. प्रतिनिधी नसल्याने गाऱ्हाने मांडण्यासाठी हक्काचा माणूसही नाही. त्यामुळे पाण्यासाठी होणारी परवड जीवघेणी ठरत आहे. एेन पावसाळ्यात येथील पाण्याची ही परिस्थिती आहे, तर उन्हाळ्यात आम्ही काय करावे, असा प्रश्र्न नागरिक विचारत आहेत.

"गाव पालिकेत गेल्यापासून आजपर्यंत आम्ही पुरेशा पाण्याची वाट पाहत आहे. ग्रामपंचायतमध्ये असतानाही अशी वाट कधी पाहवी लागली नाही. इतक्या गंभीर परिस्थितीला आज आम्हाला सामोरे जावे लागत आहे. पालिकेने इतर कामांएेवजी पाण्याचा प्रश्र्न प्राधान्याने सोडविला पाहिजे.''

- राहुल तुपे, नागरिक

"पूर्वीची वितरणव्यवस्था नादुरूस्त झाल्यामुळे अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटून रस्त्यावर पाणी वाहत आहे. त्या दुरूस्त करण्याबाबतही पालिका उदासिनता दाखवीत आहे. पिण्याचे पाणी तर वेळेवर मिळत नाहीच मात्र तुटलेल्या जलवाहिन्यांमुळे वापराचे पाणीही मिळणे दुरापास्त झाले आहे.'' 
- ऊषा ठाणगे, महिला नागरिक

Web Title: Manjari have a serious Problem about the water