मांजरीमध्ये मुळा-मुठेने घेतला मोकळा श्वास

कृष्णकांत कोबल
मंगळवार, 8 मे 2018

मांजरी - येथील मुळा-मुठा नदीवरील पुलाखालील हंगामी जुन्या पुलाचा अडथळा ग्रामपंचायतने यंत्राच्या साह्याने काढून टाकला आहे. त्यामुळे अडून राहिलेला नदी प्रवाह मोकळा झाला असून जलपर्णी वाहून जाण्यास मदत झाली आहे.

मांजरी - येथील मुळा-मुठा नदीवरील पुलाखालील हंगामी जुन्या पुलाचा अडथळा ग्रामपंचायतने यंत्राच्या साह्याने काढून टाकला आहे. त्यामुळे अडून राहिलेला नदी प्रवाह मोकळा झाला असून जलपर्णी वाहून जाण्यास मदत झाली आहे.

मुंढवा-खराडी ते मांजरी परिसरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदी पात्रावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्याने काठावरील नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. त्यासाठी येथील आखिल मांजराईनगर नागरिक कृती समितीच्या वतीने नदी काठावर मच्छरदाणी आंदोलन केले होते. पालिका प्रशासनाने त्याची दखल घेऊन जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र नवीन पुलाखालील जुन्या हंगामी पुलाच्या अडथळ्यामुळे जलपर्णी वाहून जात नव्हती. ग्रामपंचायतने जेसीबी यंत्राच्या साह्याने या पुलाचे अवशेष दूर करुन प्रवाह मोकळा केला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर कापलेली जलपर्णी वाहून जात आहे.

जलपर्णी बरोबर डासांचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा धोका कमी झाला आहे. येत्या काही दिवसात जलपर्णी मोठ्या प्रमाणात कमी होईल. 

''जलपर्णीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. पालिका व ग्रामपंचायतीच्या वतीने ती काढण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, जुन्या पुलाच्या अडथळ्यामुळे कामात अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे नदीमध्ये जेसीबी उतरवून प्रवाह मोकळा केला असून जलपर्णी वाहून जाण्यास मदत झाली आहे''.
अनिल कुंभार
ग्रामविकास अधिकारी, मांजरी बुद्रुक

Web Title: manjari mula mudha river