मांजरी रस्त्याचे काम  "जैसे थे' 

kobal1.JPG
kobal1.JPG

पुणे : महादेवनगर-मांजरी रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाची मुदत संपूनही हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराला पुन्हा डिसेंबरअखेरची मुदत वाढवून दिली आहे. मात्र, अद्यापही हे काम दुर्लक्षितच आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसह प्रवाशांना येथून प्रवास करताना सध्या मोठी कसरत करावी लागत आहे. 

येथील पूनावाला ग्रुपच्या सीएसआर निधीतून अण्णासाहेब मगर महाविद्यालय ते रेल्वे गेटपर्यंत दोन किलोमीटर अंतराच्या सुमारे पंचवीस कोटी रुपयांच्या रस्ता रुंदीकरण व कॉंक्रिटीकरणाचे काम करण्यात येत आहे. मात्र, पहिली मुदत एप्रिल 2019 ला संपूनही हे काम पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी हे काम अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराला पुन्हा डिसेंबर 2019 अखेरपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे. त्यानंतरही या कामाला सुरुवात झालेली दिसत नाही. 

सध्या या रस्त्यावरील अण्णासाहेब मगर महाविद्यालय, चौरंग अंगण, किर्लोस्कर सोसायटी, घुले पार्क, जुना कालवा, गोपाळपट्टी, दरडी फाटा, रेल्वेगेट आदी ठिकाणचे कॉंक्रिटीकरण रखडले आहे. सेवावाहिनी, कालव्यावरील पूल, पादचारी मार्ग, दुभाजक आदी कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या सर्व अडचणीतून मार्ग काढताना वाहनचालकांना व पादचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. याशिवाय कोठेही धोक्‍याची सूचना देणारे अथवा दिशादर्शक फलक नसल्याने दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. ठिकठिकाणच्या दुरवस्थेमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. 
पादचारी मार्गावर काही ठिकाणी डक उघडे आहेत. पेव्हरब्लॉक उखडलेले आहेत. वीजवाहिन्यांचे पाइप उघडे पडलेले आहेत. यातून मार्ग काढताना पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. सध्या दररोज होत असलेल्या पावसामुळे हा धोका अधिक वाढला आहे. 

"कंत्राटदाराकडून रस्त्याची अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे संपूर्ण पावसाळा येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. पादचारी मार्गावरून चालता येत नाही आणि रस्त्यावरून नीट वाहन चालवता येत नाही, अशी परिस्थिती येथे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याबाबत गांभीर्याने घेतले पाहिजे.' 
- सुनील घुले, स्थानिक रहिवासी 

------------------------ 
"आम्हा महिलांना व लहान मुलांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. पादचारी मार्गाचे काम पूर्ण नसल्याने त्यावरील अडथळे चुकवताना वारंवार रस्त्यावर यावे लागत आहे. त्यामुळे वाहनांबरोबरच काम अपूर्ण असलेल्या ठिकाणी उघडी पडलेली खडी उडून अपघात होण्याचा धोका वाढला आहे.' 
- अमिता कदम, स्थानिक रहिवासी 

---------------------------- 
"अनेक ठिकाणी नागरिकांनी काम अडवले आहे. काही वाहिन्यांची कामे अपूर्ण आहेत. असे पाच-दहा टक्के काम रखडले आहे. त्याबाबत संबंधितांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येत आहे. वाढून दिलेल्या मुदतीमध्ये हे काम पूर्ण केले जाईल.' 
- धनंजय देशपांडे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com