मांजरी - रेल्वेगेट क्रमांक तीनवर उड्डाणपूल उभारणीचे काम बंद

कृष्णकांत कोबल
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

मांजरी - येथील रेल्वेगेट क्रमांक तीनवर महिनाभरापूर्वी सुरू झालेले उड्डाणपूल उभारणीचे काम येथील काही स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्याने बंद पडले आहे. पूलासाठी घेण्यात आलेल्या खड्यांभोवतीचे संरक्षक पत्रे व इतर साहित्य सध्या अस्ताव्यस्त पडले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

मांजरी - येथील रेल्वेगेट क्रमांक तीनवर महिनाभरापूर्वी सुरू झालेले उड्डाणपूल उभारणीचे काम येथील काही स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्याने बंद पडले आहे. पूलासाठी घेण्यात आलेल्या खड्यांभोवतीचे संरक्षक पत्रे व इतर साहित्य सध्या अस्ताव्यस्त पडले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

उड्डाणपूलाच्या कामासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नसल्याचे मिळकतदारांचे म्हणने आहे. याशिवाय येथील नागरिकांना ये- जा करण्यासाठी सेवारस्ताही दिलेला नाही. असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने पूलाच्या कामाला महिनाभरापूर्वी सुरुवात केली आहे. मात्र, काम सुरू होऊन काही दिवस झाल्यानंतरही मोबदला व सेवा रस्त्याचा प्रश्न मिटलेला नाही. त्यामुळे गेली काही दिवसांपासून हे काम बंद पाडण्यात आले आहे.

उड्डाणपूलाच्या कामासाठी सुरवातीला दोन्ही बाजूला १२ मीटर प्रमाणे असे २४ मीटरचे संपादन करण्यात आले होते. त्यात दिलेला मोबदलाही अनेक शेतकऱ्यांना मान्य नव्हता. काही शेतकऱ्यांनी अद्यापही त्याचा मोबदला घेतला नाही. त्यातच आता ३० मीटरचे संपादन केले आहे. मात्र, त्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. तसेच स्थानिक नागरिकांना ये - जा करण्यासाठी सेवा रस्ताही केला नसल्याचे शेतकरी रमेश घुले, संजय घुले, शंकर घुले, गुलाब घुले, सुभाष रासकर, आण्णासाहेब कापरे यांचे म्हणणे आहे. सध्या काम बंद असून ठेकेदाराने लावलेले साहित्य अस्तावेस्त पडले आहे. खड्डे अर्धवटच असून त्याला सुरक्षा नसल्याने येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. 

"उड्डाणपूलाचे काम करण्यासाठी ३० मीटरचे जमीन संपादन झाले आहे, मात्र त्यासाठी दिलेल्या मोबदल्या संदर्भात महसूल विभागाशी  चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूच्या नागरिकांना ये - जा करण्यासाठी सध्या एका बाजूने १० फुटांचा रस्ता करण्यात येणार आहे, त्यामुळे काम बंद आहे.'
नकुल रणसिंग, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

पोलीस बंदोबस्तात होणार काम सुरू
उड्डाणपूलाच्या कामामध्ये येत असलेली अतिक्रमणे हटविण्यासाठी काही मिळकतदारांकडून अडथळा येत आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पोलीस बंदोबस्त मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

Web Title: manjari - stop construction work on railway gate number three