मांजरी पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहर परिसरातील ओढ्या नाल्यांचे पाणी मुळा-मुठा नदीला मिळाले आहे. त्यामुळे नदीला पूर आला आहे.

मांजरी : गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहर परिसरातील ओढ्या नाल्यांचे पाणी मुळा-मुठा नदीला मिळाले आहे. त्यामुळे नदीला पूर आला आहे. या पूरामुळे मांजरी बुद्रुक व मांजरी खूर्द गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला असून  दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. गंभीर परिस्थिती असतानाही विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांसह अनेक वाहन चालक पूलावरून धोकादायक प्रवास करीत होते. दरम्यान पोलिसांनी दोन्हीही बाजूला बँरिकेडस लावून पूलावरील वाहतूक बंद केली आहे.

येथील मुळा-मुठा नदीवर काही वर्षांपूर्वी हंगामी पूल बांधलेला आहे. क्षमता नसतानाही सध्या या पूलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. हा पूल नगर  सोलापूर महामार्गांना जोडणारा आहे. त्यामुळे अवजड वाहनांसह इतर सर्वप्रकारची खासगी आणि सार्वजनिक वाहतूक येथून होत आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे व तुटलेले कठडे यामुळे वाहतूकीसाठी आगोदरच धोकादायक झालेला हा पूल पूरामुळे आणखीनच धोकादायक झाला आहे. 

मांजरी खुर्द येथील होली एंजल्स स्कूल आज अकरा वाजेपर्यंतच चालू होती. पाणी वाढत असल्याचे समजताच पालकांनी आपल्या मुलांची माहिती घेतली. तरीही सुरूवातीच्या तासाभरात काही विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी धोकादायकपणे पूलावरून प्रवास केला. 

पाऊस सुरू राहिल्यास पूरस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यातच खडकवासला धरणातूनही पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे पूराचा धोका आहे. प्रवाशांनी येथून प्रवास न करता पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manjri bridge went underwater which led to heavy traffic in the area