मांजरी जि.प. शाळेला संरक्षक भिंत नसल्याने विद्यार्थ्यांना अपघाताचा धोका

कृष्णकांत कोबल
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मांजरी - येथील मांजरी-मुंढवा रस्त्याच्या रूंदीकरणामुळे थेट रस्त्यालगत आलेल्या जिल्हापरिषद भागशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेच्या दुरवस्थेबाबत अनेक वेळा जिल्हा प्रशासनाला कळवूनही त्याकडे मोठ्याप्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना भीतिदायक वातावरणात शिक्षण घ्यावे लागत आहे.

मांजरी - येथील मांजरी-मुंढवा रस्त्याच्या रूंदीकरणामुळे थेट रस्त्यालगत आलेल्या जिल्हापरिषद भागशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेच्या दुरवस्थेबाबत अनेक वेळा जिल्हा प्रशासनाला कळवूनही त्याकडे मोठ्याप्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना भीतिदायक वातावरणात शिक्षण घ्यावे लागत आहे.

मांजरी-मुंढवा रस्त्यावर म्हसोबावस्ती येथे १९५६ सालापासून दोन वर्गखोल्यांची जिल्हापरिषद भागशाळा आहे. सध्या दोन सत्रात भरणाऱ्या या शाळेत मुख्याध्यापकासह चार शिक्षक असून पहिली ते चौथीचे ११७ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. येथील रस्त्याच्या रूंदीकरणात शाळेची संरक्षक भिंत काढूण टाकावी लागली आहे. त्यामुळे शाळा इमारत थेट रस्त्यालगत आली आहे. 

या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहतूक वाढली आहे. मांजरी रेल्वेगेट बंद झाल्यानंतर ही वाहतूक दुपटीने वाढणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येताजाता जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. संरक्षक भिंत नसल्याने शाळेच्या बाहेर वावरताना, मधल्या सुट्टीत व इतर कारणाने वर्गाबाहेर जा-ये करताना विद्यार्थ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. शाळेची इमारतही  कमकुवत झाली आहे. ११७ विद्यार्थ्यांमागे केवळ दोनच स्वच्छतागृहे आहेत. त्यांचीही दुरवस्था झाली आहे. शिक्षकांना मुलांना शिकवण्यापेक्षा त्यांना काही धोका होऊ नये म्हणून त्यांच्यावर कायम पाळत ठेवावी लागत आहे. एखादा विद्यार्थी बाहेर जायचा असला तरी शिक्षकांना त्याच्या सोबत यावे लागते. शाळा इमारत व एकूणच शाळा परिसर धोकादायक झाल्याने या इमारतीचे लवकरात लवकर स्थलांतर करावे, अशी मागणी पालकांनी कली आहे.

मुख्याध्यापिका मग्दालिना सोनकांबळे म्हणाल्या, "ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हापरिषद अधिकारी व लोकप्रतिनिधींकडे वेळोवेळी संरक्षक भिंतीची गरज व्यक्त केली आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. येथील सर्व शिक्षकांना मोठी जोखीम घेऊन काम करावे लागत आहे. त्यासाठी शाळा इमारतीची डागडुजी व संरक्षक भिंत लवकर बांधली पाहिजे.'

"विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेला संरक्षक भिंतीची गरज आहे. त्याबाबत मंडल अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न लवकरच सोडविला जाईल.'
रामदास वालझाडे
गटशिक्षण अधिकारी

"ग्रामपंचायतला मिळणाऱ्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून शाळेच्या संरक्षक भिंतीसाठी तरतुद केली जाईल. तसेच इमारतीच्या नुतणीकरणासाठी जिल्हापरिषदेकडे पाठपुरावा केला जाईल.'
अमित घुले
उपसरपंच, मांजरी बुद्रुक 

Web Title: manjri school students are at risk of accidents