मांत्रिक रोखण्यासाठी तांत्रिक नजर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पुणे - अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या तुमच्या रुग्णावर आता सीसीटीव्हीच्या देखरेखीत उपचार करण्याकडे रुग्णालयांचा कल वाढत आहे. काही दिवसांपूर्वी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल रुग्णावर वैद्यकीय उपचाराबरोबरच मांत्रिकाद्वारेही उतारा काढण्यात आला होता. या प्रकरणानंतर गेल्या महिन्याभरात शहरातील प्रमुख रुग्णालयांनी अतिदक्षता विभागाच्या सुरक्षा व्यवस्थेत आमूलाग्र बदल केला आहे. 

पुणे - अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या तुमच्या रुग्णावर आता सीसीटीव्हीच्या देखरेखीत उपचार करण्याकडे रुग्णालयांचा कल वाढत आहे. काही दिवसांपूर्वी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल रुग्णावर वैद्यकीय उपचाराबरोबरच मांत्रिकाद्वारेही उतारा काढण्यात आला होता. या प्रकरणानंतर गेल्या महिन्याभरात शहरातील प्रमुख रुग्णालयांनी अतिदक्षता विभागाच्या सुरक्षा व्यवस्थेत आमूलाग्र बदल केला आहे. 

मांत्रिक प्रकरणानंतर अतिदक्षता विभागातील सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेण्यात आली. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे. यापूर्वी रुग्णालयाचे प्रवेशद्वार, बाह्य रुग्ण विभाग अशा मोजक्‍या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात होते; पण आता अतिदक्षता विभागातील हालचाली टिपण्यासाठी यातील प्रत्येक कोपरा कव्हर होईल, अशी व्यवस्था शहरातील प्रमुख रुग्णालयांमधून करण्यात येत आहे. त्यात कॅमेऱ्यांची संख्या वाढवितानाच त्यांची गुणवत्ताही पाहिली जात आहे. आता नाइट व्हीजन कॅमेऱ्यांचा समावेश केला आहे, अशी माहिती वेगवेगळ्या रुग्णालयांच्या प्रशासनाने दिली.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा 
अत्यवस्थ रुग्ण लवकर बरा व्हावा, यासाठी आपली श्रद्धा असलेल्या देवाची प्रार्थना करणे इथपर्यंत कोणाची हरकत नसते; पण रुग्णाची दृष्ट काढणे, त्याच्यावरून उतारा उतरविणे अशा गोष्टींवर काही नातेवाइकांची श्रद्धा असते. त्या वेळी हा प्रश्‍न संवेदनशील होतो, अशा काही घटना गेल्या महिन्याभरात घडल्याचे काही रुग्णालयांनी सांगितले. आपल्या दृष्टीने अंधश्रद्धा असणारी गोष्ट नातेवाइकांच्या दृष्टीने श्रद्धा असते. त्यातून तणावाची स्थिती निर्माण होते, असाही अनुभव काही रुग्णालयांना आला आहे.

खबरदारी घेण्याची सूचना
अतिदक्षता विभागातील डॉक्‍टर, परिचारिका आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही रुग्णालय प्रशासनाने दिल्या आहेत. शहरातील प्रमुख रुग्णालयांनी अतिदक्षता विभागासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली असल्याची माहितीही पुढे आली आहे. अतिदक्षता विभागात नातेवाइकांसोबत जाणारी व्यक्ती कोण आहे, तिच्या हातात काही आहे का, सोबत असलेल्या पिशवीमध्ये काय आहे, याची विचारपूस करूनच व्यक्तीला अतिदक्षता विभागात काही मोजक्‍या वेळेसाठी सोडण्यात येते. त्यातही ती व्यक्ती आतमध्ये काय करत आहे, यावर आता सीसीटीव्हीने लक्ष ठेवले जाते. 

रुग्णालयांत अशा प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत, याची काळजी समाजानेच घेतली पाहिजे. नातेवाइकांनी डॉक्‍टर आणि रुग्णालयावर विश्‍वास ठेवला पाहिजे. काही प्रसंगी, नातेवाइकांनी दुसऱ्या डॉक्‍टरांकडून सेकंड ओपिनीयनदेखील घ्यावे; पण वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नसलेल्यांकडून सल्ला घेऊ नये. कारण, आधुनिक काळात वैद्यकशास्त्रात पुराव्यावर आधारित उपचार होतात.
- डॉ. नितीन भगली, सदस्य, इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखा, हॉस्पिटल बोर्ड कमिटी.

Web Title: mantrik tantrik cctv watch