सुरक्षेसाठी लावलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद; किरकटवाडी-खडकवासल्यातील स्थिती

Many CCTV cameras installed for security at Kirkatwadi have been shut down 2.jpg
Many CCTV cameras installed for security at Kirkatwadi have been shut down 2.jpg

किरकटवाडी (पुणे) : नागरिकांच्या सुरक्षेसाठी व अनुचित प्रकार रोखण्यासाठी किरकटवाडी, खडकवासला या गावांमध्ये तसेच खडकवासला धरणावर बसविण्यात आलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने, 'असून अडचण आणि नसून खोळंबा' असे चित्र सध्या दिसत आहे. सुमारे वर्षभरापूर्वीच ग्रामपंचायतींच्या माध्यमातून हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

हे ही वाचा : केंद्र सरकारने कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात आणण्यासाठी परदेशातून कांदा आयातीचे धोरण स्विकारले आहे.
  
किरकटवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकटवाडी गावच्या हद्दीत एकूण 60 कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यापैकी केवळ 20 कॅमेरे सध्या सुरू असून तब्बल 40 कॅमेरे बंद आहेत तर खडकवासला गावच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खडकवासला गावच्या हद्दीत एकूण 33 कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यापैकी 21 कॅमेरे सुरू असून 12 कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. 

पाटबंधारे विभागाच्या खडकवासला धरण शाखेमधून मिळालेल्या माहितीनुसार पुणेकरांसाठी पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खडकवासला धरणावरील 16 कॅमेऱ्यांपैकी चार कॅमेरे बंद आहेत. अशाप्रकारे इतरही गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीबाबत उदासीनता असल्याने एखादी अनुचित घटना घडल्यानंतर ज्यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली जाते. तेव्हा संबंधित कॅमेरा बंद असल्याचे लक्षात येते. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तातडीने दुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणी नागरिकांसह पोलिस प्रशासनाकडूनही करण्यात येत आहे. 

डिझेल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी फाटा तसेच किरकटवाडी, खडकवासला येथील अंतर्गत रस्त्यावरील काही ठिकाणी रात्रीच्या वेळी वाहनांमधील डिझेल चोरीला जाण्याच्या घटना मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्यास असे चोर पकडले जाऊ शकतात.

हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार म्हणाले, अनेक गंभीर गुन्ह्यांमधील गुन्हेगार पकडण्यास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत झालेली आहे. मुख्य रस्त्यावर रात्रीच्या वेळी उपयुक्त ठरतील असे 'ॲंटी रिफ्लेक्शन' कॅमेरे बसविण्यात यावेत. ज्यामुळे वाहनांच्या प्रकाशाचा प्रभाव भेदून वाहनाचा क्रमांक टिपला जाईल. गावच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे असल्याने बंद कॅमेऱ्यांची दुरुस्ती करण्यात यावी.

हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के म्हणाले, 'ज्या गावांमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतील तेथील ग्राम विकास अधिकारी किंवा ग्रामसेवक यांना सदर कॅमेऱ्यांची दुरुस्ती करण्याबाबत तातडीने कळवले जाईल.'

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com