
गावातील विकास कामांसाठी निधी आल्यानंतर केवळ ग्रामस्थांच्या आपसातील मतभेदांमुळे निधी परत जाण्याची वेळ वहागाव (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीवर आली आहे.
आंबेठाण : गावातील विकास कामांसाठी निधी आल्यानंतर केवळ ग्रामस्थांच्या आपसातील मतभेदांमुळे निधी परत जाण्याची वेळ वहागाव (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीवर आली आहे. गावातील काही ग्रामस्थांनी कधी स्वनिधीतुन तर कधी लोक सहभागातून कामे केली आहेत परंतु काही ग्रामस्थांनी कायद्यात बसत नाही असे सांगत कायद्यावर बोट ठेवले आहे.त्यामुळे विकासकामे रखडली असून गाव तसं चांगलं पण राजकारणात रमलं असे म्हणण्याची वेळ आली आहे.
मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली
खेड तालुक्यातील पश्चिम भागात वहागाव आणि देशमुखवाडी अशी दोन गावांची एकत्रित जिल्हा परिषदेची शाळा आहे.येथे नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठी या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी १४ लक्ष रुपयांचा निधी दिला होता.परंतु ज्या जागेत इमारत उभी करायची आहे तेथे काही झाडे असल्याने ही झाडे तोडू नये असे काही लोकांचे म्हणणे आहे तर निधी वारंवार मिळत नाही,आलेला निधीतुन वर्गखोल्या करू असे बहुतांश लोकांचे म्हणणे आहे.नेमक्या याच वादात हे काम रखडले असून त्यांचा वाद वन खात्याच्या कार्यालयात जाऊन पोहचला आहे.यात लवकर मार्ग निघाला नाही तर निधी परत जाईल अशी शक्यता ग्रामसेविका बोरकर यांनी व्यक्त केली.
याशिवाय गावात काही कामे ग्रामस्थांनी लोकसहभागातून केली असून त्यासाठी ज्यांनी निधी दिला त्यांच्या संबंधितांची नावे त्यावर टाकली आहे तर अशा सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या नावाचे फलक नसावे असे काहींचे म्हणणे आहे.याच वादात पेव्हिंग ब्लॉकचे काम रखडले असून तत्कालीन आमदार सुरेश गोरे यांनी तीन लक्ष रुपये निधी जाहीर केला होता तर शरद बुट्टेपाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तीन लक्ष रुपयांचा निधी दिला होता.हे काम देखील अर्धवट पडले आहे.
अशीच अवस्था लोकसहभागातून काम होत असलेल्या स्वागत कमानीची झाली आहे.याचा वाद तर कोर्टाच्या दारात जाऊन पोहचला आहे.
कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू
१५ डिसेंबरपर्यंत वन विभागाकडून शाळा परिसतील झाडे तोडण्यासाठी परवानगी मिळाली नाही तर निधी परत जाईल.कोणताही पक्ष किंवा लोक सहभागातून कामे होत असतील तर ग्रामस्थांनी करून घ्यावीत.गावातील ठराविक लोकांच्या विरोधामुळे कामे रखडली आहेत.-सविता बोरकर, ग्रामसेविका, वहागाव
गावाबाहेर राहणारे काही ठराविक लोक माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून विकास कामात अडथळा आणत आहेत.तसेच ग्रामपंचायतीला वेठीस धरत आहेत.त्यांबाबत तंटामुक्ती समितीची बैठक घेऊन अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकारी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे करणार आहे.-सत्यवान नवले, माजी उपसरपंच,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य
(संपादन : सागर डी. शेलार)