अनेक अधिकारी स्वेच्छानिवृत्तीच्या तयारीत

- संदीप घिसे
शुक्रवार, 3 मार्च 2017

धास्तावलेल्यांचा भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी टाळण्याचा प्रयत्न

पिंपरी - राष्ट्रवादीची महापालिकेत एकहाती सत्ता असताना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे भाजपने उघडकीस आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिकेतील सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. आता महापालिकेत सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आली आहे. यामुळे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. चौकशीचा फेरा चुकविण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याची तयारी केली आहे.

धास्तावलेल्यांचा भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी टाळण्याचा प्रयत्न

पिंपरी - राष्ट्रवादीची महापालिकेत एकहाती सत्ता असताना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे भाजपने उघडकीस आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिकेतील सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. आता महापालिकेत सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आली आहे. यामुळे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. चौकशीचा फेरा चुकविण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याची तयारी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेली १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. यामुळे अनेक प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांना हाताशी पकडून भ्रष्टाचार केल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. यामध्ये विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्ती घोटाळा, गॅस शवदाहिनी घोटाळा, शिलाई मशिन घोटाळा, एचबीओटी मशिन घोटाळा, क्षयरोग तपासणी मशिन, अग्निशामक दलासाठी क्‍यूआरव्ही वाहने, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, स्वस्त घरकूल अर्ज छपाई, भूमिगत केबल घोटाळा आदींचा समावेश आहे. अनेकदा भ्रष्टाचार सिद्ध होऊन येथील अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस करणारा प्रस्ताव आयुक्‍तांकडून महापालिका सभेसमोर आला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने येथील अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याची भूमिका सभागृहात घेतली. यामुळे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या मनोबलात वाढ होत गेली.

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्ती घोटाळा व गॅस शवदाहिनी घोटाळा यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आयुक्‍त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. यामुळे आयुक्‍तांनी या दोन्ही प्रकरणामध्ये चौकशी समिती नेमली होती. मूर्ती घोटाळा चौकशी समितीच्या अहवालावरून भांडार विभागातील चार जणांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. तर गॅस दाहिनी घोटाळा चौकशी अहवालावरून पर्यावरण विभागातील पाच जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीत भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा भाजपने प्रचारात घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चिंचवड येथील जाहीर सभेत बोलताना महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या सर्व प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनीदेखील महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत टीका केली होती. तसेच येथील भ्रष्टाचाऱ्यांना निवडणुकीनंतर तुरुंगात पाठवू, अशी घोषणा केली होती. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून महापालिकेत सत्तांतर झाल्यामुळे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यापुढील काळात आपली कोणतीही चौकशी होऊ नये व त्यातून आपल्यावर ठपका येऊ नये म्हणून अनेक जण स्वेच्छा निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहेत.
 

आणखी काही प्रकरणांची चौकशी होणार
शीतल बाग येथील पादचारी पूल आणि नाशिक फाटा येथील उड्डाण पूल यांची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आता या प्रकरणांसह महापालिकेतील सर्व प्रकरणांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी होणार असून, याबाबत तयारी सुरू असल्याचे समजते. यामुळे धास्तावलेल्या काही अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीची तयारी सुरू केली आहे. या महापालिकेतील अधिकारी सर्वाधिक भ्रष्ट असल्याबाबत कायम चर्चा असते.

Web Title: many officers of the voluntary spirit