एल्गार परिषदेला माओवादी संघटनांची आर्थिक मदत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

पुणे - एल्गार परिषदेला बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) व अन्य माओवादी संघटनांनी आर्थिक मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या संदर्भात जप्त केलेल्या एका पत्रात प्रकाश आंबेडकर यांच्यासह कॉंग्रेसच्या काही नेत्यांचा उल्लेख आहे, अशी माहिती पुणे पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 

पुणे - एल्गार परिषदेला बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) व अन्य माओवादी संघटनांनी आर्थिक मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या संदर्भात जप्त केलेल्या एका पत्रात प्रकाश आंबेडकर यांच्यासह कॉंग्रेसच्या काही नेत्यांचा उल्लेख आहे, अशी माहिती पुणे पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 

या वेळी परिमंडळ दोनचे उपआयुक्त डॉ. प्रवीण मुंढे, सहायक आयुक्त शिवाजी पवार हे उपस्थित होते. ते म्हणाले, ""एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा हिंसाचाराबाबत राज्य सरकारचे 50 लाख रुपयांचे बक्षीस असलेले फरार माओवादी नेते मिलिंद तेलतुंबडे यांनी 2 जानेवारी रोजी रोना विल्सन यांना एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात देशात उसळलेल्या हिंसक आंदोलनाचा "सीपीआय माओवादी' पक्षाच्या वाढीसाठी फायदा होऊ शकतो. प्रकाश आंबेडकरांसह कॉंग्रेसच्या काही नेत्यांचे सहकार्य घेता येईल, असा उल्लेख आहे. त्यामुळे आंबेडकर व अन्य नेत्यांचा अप्रत्यक्ष संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे.'' 

""एल्गार परिषद ही माओवाद्यांची रणनीती यशस्वी करण्याचा एक भाग होता. विल्सन पूर्णवेळ कार्यकर्ते असून, सुरेंद्र गडलिंग हे माओवादी संघटनांशी थेट संबंधित आहेत. त्यांच्या घरी पत्रे, पुस्तके, हार्ड डिस्क, पेनड्राइव्ह सापडले आहेत. हार्ड डिस्कच्या "फॉरेन्सिक क्‍लोनिंग कॉपी'च्या आधारे तपास केला. त्यात सीपीआयची मूळ कागदपत्रे आढळली. त्यावरून विल्सन व गडलिंग यांचे माओवाद्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचे धागेदोरे ढवळे यांच्यापर्यंत पोचतात. तसेच राऊत, सेन यांचादेखील संबंध असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, 17 एप्रिल रोजी कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घराच्या झडतीत माओवाद्यांशी संबंधित कागदपत्रे मिळालेली नाहीत; पण ते माओवाद्यांशी थेट संबंधित नसले तरी त्यांचे "फूट सोल्जर्स' म्हणून शहरी भागात काम करतात, असेही त्यांनी सांगितले. 

कॉम्रेड मंगलू आणि दिपू ढवळेंच्या संपर्कात  
31 डिसेंबरला एल्गार परिषदेच्या आयोजनापूर्वी दोन महिन्यांपासून सीपीआय माओवादी पक्षाचे भूमिगत कार्यकर्ते कॉम्रेड मंगलू आणि दिपू हे नियोजन आणि आर्थिक मदतीसाठी सुधीर ढवळे यांच्या संपर्कात होते. त्यामुळे सीपीआय माओवादी पक्षाशी ढवळे आणि अन्य आरोपींचा थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर "बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक' अधिनियमातील 13, 16, 17, 18, 18 ब, 20 आणि 39 कलमांअंतर्गत कारवाई केल्याची माहिती कदम यांनी दिली. 

सहआयुक्त रवींद्र कदम म्हणाले... 
- या प्रकरणात कोरेगाव भीमा दंगलीशी तूर्तास थेट संबंध नाही 
- अटकेतील व्यक्तींनी किती रक्कम आणली याचा तपास सुरू 
- गरज पडल्यास मेवाणी व खालिद यांची चौकशी 
- ग्रामीण पोलिसांनी दंगलीसंदर्भात प्रतिज्ञापत्र काय दिले याची माहिती नाही 
- मनोहर भिडे यांचा गुन्हा ग्रामीण पोलिसांकडे, आमच्याकडे नाही 

ढवळेंसह पाच जणांना 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी 
मुंबईतून विद्रोही मासिकाचे संपादक सुधीर ढवळे, नागपूर येथून प्राध्यापिका शोमा सेन, भारत जनआंदोलन संघटनेचे महेश राऊत, वकील सुरेंद्र गडलिंग, तसेच मानवाधिकार कार्यकर्ते रोना विल्सन यांना दिल्लीतून बुधवारी अटक करण्यात आली. गडलिंग यांना सकाळी सात वाजता, तर अन्य चार जणांना दुपारी तीनच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. 

Web Title: Maoist Organise Elgar Parshad In Pune