मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा आमदार कुलकर्णी यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न

विनायक बेदरकर
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास मराठा आंदोलकांनी आमदार कुलकर्णी यांच्या डहाणूकर कॉलनीतील घरासमोर आंदोलन करण्यास सुरवात केली. यावेळी एका आंदोलकाने घराच्या दिशेने रिकामी प्लॅस्टिक बाटली फेकल्यावर कुलकर्णी यांच्या मुलाने गॅलरीमध्ये येऊन बोलल्याने आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी इमारतीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला.

पुणे : मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आक्रमक होत कोथरुड मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलकांना रोखून धरले.

शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास मराठा आंदोलकांनी आमदार कुलकर्णी यांच्या डहाणूकर कॉलनीतील घरासमोर आंदोलन करण्यास सुरवात केली. यावेळी एका आंदोलकाने घराच्या दिशेने रिकामी प्लॅस्टिक बाटली फेकल्यावर कुलकर्णी यांच्या मुलाने गॅलरीमध्ये येऊन बोलल्याने आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी इमारतीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. ‎यावेळी स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलकांना इमारतीत शिरण्यास मज्जाव केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलकांनी जोरदार घोषणा देत कुलकर्णी यांनी मराठा आंदोलनाबाबतीत केलेल्या व्हायरल वक्तव्याबाबतीत माफी मागावी, अशी मागणी केली. 

‎यावेळी निषेध व्यक्त करीत काही आंदोलकांनी रस्त्यावर बसून मुंडण केले. अलंकार पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. गुरुवारी मराठा आंदोलकांनी भाजप मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केले होते. या आंदोलनाला कुलकर्णी यांनी स्टंटबाजी म्हटल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले.

प्रत्यक्षात कुलकर्णी यांनी असे बोलले नसल्याचे म्हटले आहे. 
गुरुवारी या घटनेनंतर आज आक्रमक झालेल्या आंदोलकांनी कुलकर्णीचे घर गाठले. त्यांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Web Title: Maratha community Peoples tried to enter the house of MLA Kulkarni