#MarathaKrantiMorcha पुरंदरमधील वाल्हेत कडकडीत बंद

किशोर कुदळे
मंगळवार, 24 जुलै 2018

वाल्हे (पुणे) : सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी परळी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षिय सकल मराठा समाजाच्या वतीने वाल्हे (ता.पुरंदर) येथे आज मंगळवार (ता.24) येथे आठवडे बाजारसह व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळत आंदोलनास पाठिंबा दिला.

वाल्हे (पुणे) : सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी परळी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षिय सकल मराठा समाजाच्या वतीने वाल्हे (ता.पुरंदर) येथे आज मंगळवार (ता.24) येथे आठवडे बाजारसह व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळत आंदोलनास पाठिंबा दिला.

मराठा समाजाला आरक्षण लागू करावे यासाठी मराठा समाजातर्फे यापुर्वीही राज्यासह देशपातळीवर मोर्चे काढले. मात्र शासनाने मराठा समाजाला केवळ आश्वासन देऊन आजपर्यंत ताटकळत ठेवल्याने व अजूनही आरक्षण लागू न केल्याने पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाने दुसरे पर्व सुरू केले आहे. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी वाल्हे (ता.पुरंदर) येथील सर्वपक्षिय सकल मराठा समाज बांधवांनी शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. राज्यभरातील ठोक मोर्चास पाठिंबा म्हणुन आज येथील आठवडे बाजारासह सर्व व्यापाऱ्यांनी उस्फुर्तपणे बंद पाळला. 

दरम्यान सकाळी अकरा वाजता मराठा बांधवांनी एसटी बस स्थानका शेजारील महात्मा फुले पुतळ्यापासुन वाल्हे गावांतर्गत निषेध फेरी काढुन ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये फेरीची सांगता करण्यात आली. यामध्ये सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रय पवार, सुनिल पवार, बाळासो राऊत, गोरख कदम, सचिन जाधव, प्रदिप चव्हाण, सुर्यकांत पवार, सागर भुजबळ, सचिन पवार, बंडा पवार, सुधाकर पवार, गोरख मेमाणे,  संदेश पवार, शांताराम पवार, प्रकाश पवार, हनुमंत पवार आदिंसह तरूण सहभागी झाले होते.

निषेध फेरीदरम्यान मराठा आरक्षण लागू झाल्याशिवाय मेगा भरती करू नये, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा, सरसकट कर्जमाफी द्यावी या मागण्यांसह आंदोलनकर्त्यांनी शासनाविरोधी घोषणाबाजी केली.

यावेळी बोलताना वाल्हेचे सरपंच अमोल खवले म्हणाले की, मराठा समाजाला तात्काळ आरक्षण जाहीर करावे, मराठा क्रांती मोर्चात समाविष्ट असलेल्या इतर मागण्याही निकाली काढाव्यात अशी मागणी करण्यात आली. शासनाने आरक्षण देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अन्यथा त्याचे गंभीर परिणाम शासनाला भोगावे लागतील, असा इशाराही  सरपंच अमोल खवले यांनी दिला.

यावेळी माजी सरपंच दत्तात्रय पवार, प्रकाश शिंदे, उमेश पवार, बाळासो राऊत आदिंनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान आंदोलनप्रसंगी मराठा आरक्षणसाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Web Title: maratha kranti morcha strike at walhe