एसटी वाहतूक कोलमडली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

पुणे - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या आंदोलनाचा मोठा परिणाम शहरातील तीन स्थानकांतून होणाऱ्या एसटी वाहतुकीवर झाला. मुंबई, नाशिक, औरंगाबाद, मराठवाडा, कोकण व सोलापूर इत्यादी प्रमुख शहरांची एसटी वाहतूक बुधवारी बंद होती. कोल्हापूर, सांगली, सातारा मार्गावर सायंकाळी उशिरा बस सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. 

आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे गेल्या दोन दिवसांत शंभरहून अधिक एसटी बसवर दगडफेक झाली आहे. त्यात सुमारे 50 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे नुकसान झाले आहे. त्यातच मुंबईजवळ कळंबोलीजवळ बुधवारी दगडफेक झाली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ज्या भागात आंदोलन सुरू आहे तेथील बस न सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. त्यामुळे शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि स्वारगेट स्थानकांवरून होणारी आंतरजिल्हा एसटी वाहतूक बंद होती, तर जिल्हांतर्गत वाहतूक सुरू होती, अशी माहिती विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली. मुंबई मार्गावर होणारी सर्व एसटी वाहतूक बंद होती; तसेच मार्गावरील हॉटेलही बंद ठेवण्यात आले होते. खासगी वाहतूक मात्र काही प्रमाणात सुरू होती. आंदोलन स्थगित केल्याचा निर्णय जाहीर झाल्यावर मुंबई मार्गावरील वाहतूक सुरू करता येईल का, याची चाचपणी एसटीच्या पुण्यातील अधिकाऱ्यांनी केली; परंतु तणावाची परिस्थिती असल्यामुळे वाहतूक सुरू होऊ शकली नाही. तत्पूर्वी सकाळी दहा वाजेपर्यंत या मार्गावर वाहतूक सुरू होती. 

कोल्हापूर, सांगली, सातारा मार्गावरील सायंकाळनंतर टप्प्याटप्प्याने एसटी वाहतूक सुरू करण्यात आली; परंतु प्रवाशांची संख्या फारशी नव्हती. 

आंदोलन सुरू असलेल्या शहरांमधील जसे जसे जनजीवन सुरळीत होईल, त्यानुसार एसटी वाहतूक सुरू करण्यात येईल. 
-यामिनी जोशी, विभागीय नियंत्रक 

Web Title: Maratha Reservation effcet on st bus transport