मराठा संवाद यात्रांना सुरवात 

मराठा संवाद यात्रांना सुरवात 

पुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून देण्यासाठी राज्यभरात मराठा संवाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी पुण्यासह नगर, नाशिक, औरंगाबाद, परभणी, जालना, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून संवाद यात्रांना सुरवात झाली. तर, अन्य जिल्ह्यांतील संवाद यात्रा टप्प्याटप्प्याने निघून सर्व जण २६ नोव्हेंबरला मुंबईत विधानभवनावर धडकणार आहेत. 

मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात संवाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील संवाद यात्रेला शुक्रवारी ‘एसएसपीएमएस’ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरवात झाली. ही संवाद यात्रा स्वारगेट, बिबवेवाडी, कात्रज, कोंढवा, खडी मशिन चौक, उंड्री, मंतरवाडी, वडकी नालामार्गे सासवड येथे पोचली. 

सासवड येथे मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला शंभर दिवस पूर्ण झाले. या आंदोलनातील समाजबांधव संवाद यात्रेत सहभागी झाले. तेथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही यात्रा दुपारी जेजुरीला पोचली. यात्रेचे सर्वत्र उत्साहात स्वागत करण्यात आले. तेथून ही यात्रा वेल्हा, नीरा, निंबुत, माळेगावमार्गे रात्री बारामती येथे पोचली. तेथील जिजाऊ भवनमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले. या संवाद यात्रेत शांताराम कुंजीर, राजेंद्र कोंढरे, बुधाजीराव मुळीक, रघुनाथ चित्रे पाटील, अमर पवार, युवराज दिसले, राजेंद्र जगताप, प्रशांत वांडेकर, अजयसिंह सावंत, सारिका भोसले यांच्यासह समाजबांधव सहभागी  झाले आहेत. 

पुणे जिल्ह्यातील संवाद यात्रेचा मार्ग
बारामतीहून इंदापूर, भिगवणमार्गे दौंड येथे शनिवारी (ता. १७) मुक्‍काम. दौंडमधून पाटस, वरवंड, चौफुला, केडगाव, पारगाव, नाव्हरा, शरदवाडी, शिरूर, नारायणगाव येथे रविवारी (ता. १८) मुक्‍काम. सोमवारी (ता. १९) जुन्नर, पुन्हा नारायणगाव, मंचर, खेड, चाकण, तळेगावमार्गे वडगाव मावळ येथे पहिला टप्पा पूर्ण होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात, हवेली तालुका, पिंपरी-चिंचवड, मुळशी आणि तेथून ही यात्रा मुंबईकडे रवाना होईल.

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांचा सरकारला विसर पडला आहे. त्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी शुक्रवारपासून निघालेली संवाद यात्रा २६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील विधानभवनावर पोचेल. 
- शांताराम कुंजीर, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com