#MarathaKrantiMorcha पुण्यात लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर ठिय्या आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पुणे : "मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन कायद्यातील सर्व बाबींचा पूर्तता करून तो अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी यावेळी दिले. मराठा समाजाने शांततामय मार्गाने आंदोलन करावे,' असे आवाहनही यावेळी बापट यांनी केले.

पुणे : "मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन कायद्यातील सर्व बाबींचा पूर्तता करून तो अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी यावेळी दिले. मराठा समाजाने शांततामय मार्गाने आंदोलन करावे,' असे आवाहनही यावेळी बापट यांनी केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आंदोलनकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे सरसकट मागे घेतले पाहिजे, यासह विविध मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी पालकमंत्री बापट यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करीत घंटानाद केला." मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,' "कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेतलेच पाहिजे,' "आमदार, खासदाराने जागे व्हा,जागे व्हा ,' अशा घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.

मोर्चाचे समन्वयक विकास पासलकर, राजेंद्र कोंढरे, तुषार काकडे, बाळासाहेब आमराळे, सुनीता मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजातील तरुण या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांना दिले. त्यावेळी बापट यांनी हे आश्‍वासन दिले. मराठा समाजासह धनगर आणि मुस्लिम समाजाला देखील सरकार न्याय देईल, असेही बापट यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पासलकर म्हणाले,"" आमदार आणि खासदार त्यांच्या परिसराचे नेतृत्व करतात. समाज त्यांना निवडून देतो. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचे काम काय असते. तर त्यांनी जनतेचे प्रश्‍न विधानसभेत आणि लोकसभेत मांडायचे असतात.ज्या जनतेच्या मतावर ते निवडून येतात. त्यांच्या भावनेची जपवणूक करावयाची असते. 58 मोर्चानंतरही सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे मोर्चाचा उद्रेक होत आहे. लोकप्रतिनिधीनी विधान सभेत आणि विधिमंडळात मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी.'

तर राजेंद्र कोंढरे म्हणाले,"" निरपराध लोकांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत. ते तातडीने सरकारने मागे घेतले पाहिजे. मराठा कुणबी प्रमाणपत्राचे जे आदेश निघाले आहेत. त्यांची स्थानिकस्तरावर अंमलबजावणी झालेली नाही. ती तातडीने करावी.'' तर तुषार काकडे म्हणाले,"" मराठा समाजाला सरकारने तातडीने आरक्षण द्यावे. हे आरक्षण कायमस्वरूपी टिकणारे आणि कायद्याला धरून असावे.'' 

त्यानंतर खासदार ऍड वंदना चव्हाण यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करीत घंटानाद करण्यात आला. यावेळी वंदना चव्हाण यांचे पती हेमंत चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या लष्कर परिसरातील कार्यालयाबाहेर दुपारी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले. बाळासाहेब अमराळे म्हणाले, ""मराठा समाजाच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोचविण्याचा हा प्रयत्न आहे. आता तरी सरकारने चालढकल करू नये.'' खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
 

Web Title: #MarathaKrantiMorcha thiyya Movement Against Representatives