'या' अभिनेत्रीला जामीन मंजूर, पण...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

- देश न सोडण्याच्या अटीवर जामीनही मंजूर

पुणे : विनयभंगाची खोटी तक्रार देऊन एका अभिनेत्याकडून खंडणी उकळण्याच्या प्रकरणातील अभिनेत्री सारा श्रवण हिला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी मुंबईतून अटक केली. मात्र, तिला देश न सोडण्याच्या अटीवर जामीनही मंजूर करण्यात आला आहे.

डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

याप्रकरणी अभिनेता सुभाष दत्तात्रय यादव (रा. गुलमोहर सोसायटी, शास्त्री रस्ता) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन अभिनेत्री सारा श्रवण ऊर्फ सारा गणेश सोनवणे (वय 32, रा. सध्या दुबई, मूळ रा. मुंबई) हिच्यासह अभिनेत्री रोहिणी मच्छिंद्र माने (रा.दहीटना,नळदुर्ग, तुळजापूर), दहशतवाद विरोधी पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमोल विष्णू टेकाळे (रा. स्वारगेट पोलिस वसाहत) व सराईत गुन्हेगार राम भरत जगदाळे (रा. पर्वती पायथा, सहकारनगर) अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

फिर्यादी सुभाष यादव व रोहिणी माने या दोघांनी "रोल नंबर 18' चित्रपटामध्ये अभिनय केला होता. याच चित्रपटातील एका गाण्यामध्ये सारा श्रवण हिनेही काम केले होते. या चित्रपटानंतर फिर्यादीला प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे रोहिणीने त्यांच्या मागे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. त्यानंतर रोहिणी, सारा व टेकाळे या तिघांनी मिळून फिर्यादीविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली होती.

संबंधित तक्रार मागे घेण्यासाठी त्यांनी फिर्यादीकडे लाखो रुपयांची खंडणी मागितली होती. फिर्यादींनी या प्रकाराबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. त्यांच्या आदेशानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली होती. या प्रकारानंतर सारा श्रवण ही दुबईला पळून गेली होती. तिने न्यायालयाकडे सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्यास फिर्यादीचे वकील ऍड. मिलिंद पवार व ऍड. अजय ताकवणे यांनी विरोध केला होता. त्यानंतर न्यायालयाने अर्ज फेटाळला होता.

दरम्यान, सारा मुंबईत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाला मिळाली. त्यानंतर त्यांनी तिला रविवारी मुंबईतून अटक केली. पोलिस उपायुक्त बच्चन सिंग, सहाय्यक पोलिस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जयवंत जाधव पुढील तपास करत आहेत. 

देश न सोडण्याच्या अटीवर जामीन मंजूर

सारा श्रवण हिला रविवारी दुपारी न्यालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाच्या परवानगीशिवाय भारत सोडून न जाण्याच्या अटीवर 15 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. साराच्या बाजूने जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अजय चंदेल व लाला आटोळे यांनी युक्तिवाद केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi actress Sara Shrawan Arrested in extortion case