मराठी नाटकांना फुटताहेत पंख

सुशांत सांगवे 
मंगळवार, 23 मे 2017

तरुणांनी सुरू केले ‘थिएटर फ्लेमिंगो’; गावागावांत नाट्यप्रयोग होणार

पुणे - महाराष्ट्र नाटकवेडा असतानाही मराठी नाटक मुंबई- पुणे या वर्तुळाबाहेर फारसे पोचत नाही. ग्रामीण भागात तर नाट्यप्रयोगच होत नाहीत, अशी खंत अनेकजण व्यक्त करतात. ती दूर करण्यासाठी आणि गावागावांत नाटक घेऊन जाण्यासाठी काही तरुणांनी पुढाकार घेतला आहे. ‘थिएटर फ्लेमिंगो’ असे त्यांनी या उपक्रमाला नाव दिले असून, त्यामुळे नाटक महाराष्ट्रात सर्वदूर पोचणार आहे.

ही तरुण मुले आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून नाटकाचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेली. सहसा नाटकाचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी एक तर मालिकांकडे वळतात, नाहीतर मराठी चित्रपटात जातात; पण ही ‘परंपरा’ मोडीत काढत नाटक हाच विषय पुढे घेऊन जाणारे, त्यातच खोलवर उतरण्याची तयारी दर्शविणारे काही समविचारी विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी ‘थिएटर फ्लेमिंगो’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरवात पुण्यापासूनच होत आहे.

या उपक्रमात सहभागी असलेल्या ‘ललित कला’च्या माजी विद्यार्थिनी शर्वरी कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘थिएटर फ्लेमिंगो’च्या निमित्ताने आम्ही नऊ विद्यार्थी एकत्र आलो आहोत. नाटकाशी संबंधित सर्व जबाबदारी आम्ही स्वतःच पेलणार आहोत. काही ठिकाणी तीन तासांचे नाटक, तर काही ठिकाणी सोलो प्ले सादर करू. आमची ही यात्रा पुण्यानंतर सिंधुदुर्ग, कणकवली, इचलकरंजी, कोल्हापूर, गोवा अशा निरनिराळ्या भागांत जाईल. यानिमित्ताने नाटक लोकांपर्यंत जाईल आणि आम्हालाही नाटकाकडे वेगळ्या नजरेने पाहता येईल का, हे समजेल.’’

नाटक हा विषय शिकत असताना विद्यार्थ्यांनी काही नाटके स्वतः बसवली. वेगवेगळ्या ठिकाणी ती करून पाहिली. हा अनुभव घेऊन काही विद्यार्थ्यांनी ‘थिएटर फ्लेमिंगो’ हा ‘मोबाईल थिएटर’सारखा उपक्रम हातात घेतला आहे. तो कौतुकास्पद आहे. यानिमित्ताने नाटक ग्रामीण भागापर्यंत पोचणार आहे. या उपक्रमासाठी येणारा खर्चही मुलांनीच उचलला आहे; पण पुढे ‘ललित कला’ या उपक्रमाच्या पाठीशी राहील आणि हा उपक्रम व्यापक पातळीवर घेऊन जाईल.
- डॉ. प्रवीण भोळे, संचालक, ललित कला केंद्र

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi drama